दिल्लीतील बाहेरील भागात नर्सरीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शाळेच्या वाहन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

ही घटना २३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. त्या दिवशी मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या वागण्यात झालेला बदल तिच्या आईच्या लक्षात आला. आईने विचारणा केली असता मुलीने एका ‘वाईट काकां’बद्दल सांगितले. हे काका तिला चॉकलेट देत असत आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचे तिने आईला सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीची ओळख

मुलीला आरोपीचे नाव माहीत नसल्याने तिच्या पालकांनी दुसऱ्याच दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. २४ ऑगस्ट रोजी शाळेतील विविध सीसीटीव्ही फुटेज मुलीला दाखवण्यात आले. यावेळी तिने एका व्यक्तीला ओळखले. तो शाळेचा वाहनचालक असल्याचे समोर आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीच्या मागे स्वच्छतागृहापर्यंत जाताना आणि तिला चॉकलेट देताना दिसत असल्याचे सांगण्यात आले.

शाळेच्या आवारातून आरोपीला अटक

पोलिसांनी आरोपीला शाळेच्या आवारातून अटक केली. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यामध्ये तो मुलांना चॉकलेट देत असल्याचे अनेक व्हिडिओ आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. या व्हिडिओंचा आणि आरोपीच्या इतर हालचालींचा तपास सुरू आहे.

दिल्लीतील दुसऱ्या शाळेतही अल्पवयीन मुलावर मारहाणीचा आरोप

दरम्यान, ईशान्य दिल्लीतील एका खेळशाळेतही अल्पवयीन मुलावर कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून एका शिक्षिकेला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. १६ ऑगस्ट रोजी मुलाच्या पालकांच्या लक्षात त्याच्या हातांवर आणि चेहऱ्यावर व्रण आल्याचे आले. दोन दिवसांनी मुलगा घरी आल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या. त्याला कान-नाक-घसा तज्ज्ञाकडे नेण्यात आले.

डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यांना सूज असल्याचे सांगितले. तपासणीनंतर त्याच्या कानाच्या पडद्यांना दुखापत झाल्याचे आढळले. पालकांनी शाळेतील सीसीटीव्ही चित्रण तपासल्यानंतर मुलाला मारहाण केल्याचा आरोप केला असून, या प्रकरणाचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.