Delhi Seemapuri Building Collapse: दिल्लीच्या ईशान्य भागातील सीमापुरी परिसरात बुधवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक ५ मजली जुनी इमारत अचानक कोसळली. या भीषण दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

२ ते ३ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

शाहदरा विभागाचे पोलीस उपायुक्त राजेंद्र प्रसाद मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही २ ते ३ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. “ते ढिगाऱ्याखालून आतून बोलत असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत ४ ते ५ जणांना बाहेर काढले. त्यातील एका नागरिकाने जखमी व्यक्तीला तातडीने ‘सीपीआर’ देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

भूकंपाच्या धक्क्यांनंतर इमारतीला तडे?

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उत्तराखंडमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले होते. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या इमारतीला मोठे तडे गेले होते, असा दावा नागरिकांनी केला आहे. मात्र, इमारत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तपासानंतरच सत्य समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक विस्कळीत; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

या भीषण दुर्घटनेमुळे सीमापुरी गोल चक्कर, डीएलएफ भोपुरा आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. नागरिकांनी शक्य असल्यास हा परिसर पूर्णपणे टाळावा, घटनास्थळाजवळ अनावश्यक गर्दी करू नये आणि वाहतूक पोलिसांच्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सत्य निकेतन दुर्घटनेनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष?

दिल्लीतील सत्य निकेतन भागात ६ सप्टेंबर रोजी दुरुस्तीचे काम सुरू असताना एका पीजीची इमारत कोसळली होती. त्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. या घटनेला अवघा महिना लोटत नाही तोच सीमापुरीमध्ये ही दुसरी दुर्घटना घडली आहे.

सत्य निकेतनच्या दुर्घटनेनंतर दिल्ली पालिकेने धोकादायक आणि अवैध इमारतींवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली होती. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, याच मोहिमेचा भाग म्हणून पालिकेने मंगळवारी (काल) जुन्या सीमापुरीसह अनेक भागांत अवैध बांधकामांवर कारवाई केली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही इमारत कोसळल्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर आणि सुरक्षेच्या तयारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.