स्टिकरमुळे उलगडले हत्येचे गूढ; पत्नीचे तुकडे करणाऱ्या अभियंत्याला अटक

महिलेच्या शरीराचे सात तुकडे करण्यात आले होते. ओळख पटू नये, यासाठी महिलेचा चेहरा देखील विद्रुप करण्यात आला होता.

murder
प्रातिनिधिक फोटो

दिल्लीतील शाहिन बाग परिसरातील महिलेच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून खोक्यावरील एका स्टिकरमुळे या गुन्ह्याची उकल झाली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह दोघांना अटक केली असून मुख्य आरोपी साजिद अली अन्सारी उर्फ बबलू हा इंजिनीअर आहे.

दिल्लीजवळील ओखला जंगलात २१ जून रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेच्या शरीराचे सात तुकडे करण्यात आले होते. ओळख पटू नये, यासाठी महिलेचा चेहरा देखील विद्रुप करण्यात आला होता. मृतदेहाचे तुकडे एका खोक्यात टाकण्यात आले होते.

चेहरा ठेचल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होते. पोलिसांनी आधी खबरींमार्फत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात पोलिसांना अपयश आले. शेवटी पोलिसांनी मृतदेह ज्या खोक्यात आढळला होता त्या खोक्यावरील स्टिकरच्या आधारे तपास सुरु केला. खोक्यावर ‘मुव्हर्स अँड पॅकर्स’ कंपनीचे स्टिकर होते. ती कंपनी गुरुग्राममधील असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या पथकाने त्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन रेकॉर्ड तपासले. यात तो खोका दक्षिणपूर्व दिल्लीत राहणाऱ्या जावेद नामक व्यक्तीच्या घरी पोहोचवल्याचे उघड झाले. पोलिसांनी जावेदची चौकशी केली असता हा खोका दक्षिणपूर्व दिल्लीतील फ्लॅटमध्ये असल्याचे सांगितले. ते घर जावेदने साजिद आणि त्याचा भाऊ इश्तियाकला भाडेतत्त्वार दिले होते. या दोघांनीही नुकतेच घर रिकामे केले होते.

पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवत साजिद आणि त्याचा भाऊ इश्तियाकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत साजिदने पत्नी जुहीच्या हत्येची कबुली दिली. साजिद हा इंजिनीअर असला तरी त्याला चांगली नोकरी नव्हती. यावरुन त्याचे आणि जुहीचे भांडण व्हायचे. याच कालावधीत साजिद बिहारमधील एका तरुणीच्या संपर्कात आला. त्या तरुणीशी साजिदचे सूत जुळले होते. या संबंधांमध्ये पत्नी अडथळा ठरत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली साजिदने दिली. पोलिसांनी साजिद आणि या हत्येमध्ये त्याला मदत करणारा इश्तियाक (वय २८) आणि मोहम्मद हसमत अली अन्सारी (वय ४६) यांना देखील अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Delhi sticker on carton leads police to engineer who murdered wife for extramarital affair

ताज्या बातम्या