वाढदिवस अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच एका ३४ वर्षीय तरुणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीच्या रजोकरी उड्डाणपुलावर २५ जून रोजी पहाटेच्या सुमारास एका भरधाव थार कारने दिलेल्या धडकेत या दुचाकीस्वार तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
सार्थक मट्टू असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सार्थक गुरुग्राम येथील ‘ENOUT’ नावाच्या एका खाजगी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कार्यरत होता. २५ जून रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास तो आपल्या पल्सर मोटारसायकलवरून गुरुग्रामहून नोएडाच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला.
नेमकी घटना काय घडली?
कर्नाटक पासिंग असलेल्या एका काळ्या रंगाच्या थार कारने सार्थकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेचा थरार इतका भीषण होता की सार्थक गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा सार्थकने हेल्मेट घातलेले होते. सार्थक थार कारच्या पाठीमागून जात होता. मात्र, हायवेवर चालवत असताना थार चालकाने अचानक आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने लेन बदलली. थार चालकाच्या या बेजबाबदार कृत्यामुळे सार्थकचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याची दुचाकी थार कारच्या डाव्या बाजूला प्रचंड वेगाने आदळली.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
सार्थकचा वाढदिवस अवघ्या काही दिवसांवर आला होता. घरात त्याच्या वाढदिवसाच्या तयारीची चर्चा सुरू असतानाच त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली. या अकाली निधनामुळे सार्थकच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांनी ती जप्त केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताच्या वेळी नेमके काय घडले, याचा अचूक क्रम आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस तपास पथक घटनास्थळाची पाहणी करत आहे. आरोपी चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणावरून वाहतूक नियमांचे महत्त्व पुन्हा नव्याने अधोरेखित झाले आहे.
