पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात घडलेल्या २१ वर्षीय मुस्कानच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. या हत्येप्रकरणातील आरोपी इम्रान (वय २३) सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून हत्येपूर्वीचा धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न, ड्रग्जचे व्यसन आणि चारित्र्यावर संशय यांतूनच हे हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

२१ वर्षीय मॉडेल मुस्कानची तिच्या घरी हत्या करण्यात आली. या प्रकरणात तिचा जिम ट्रेनर आरोपी असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. बुधवारी दिल्लीतल्या टिळक नगर भागातील एका इमारतीत ही घटना घडली. मुस्कान ज्या घरात वास्तव्य करत होती, तिथेच तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. इम्रान असे या जिम ट्रेनरचे नाव आहे. त्याने तिच्यावर चाकूचे वार करून तिची हत्या केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेमकी घटना काय घडली?

मुस्कान नावाची २१ वर्षीय मॉडेल दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या टिळक नगरमधील एका इमारतीत राहत होती. तिच्या घरी जाऊन जिम ट्रेनर इम्रानने तिच्यावर चाकूचे वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. इम्रान पळ काढत असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलीस आता या प्रकरणात इम्रानचा शोध घेत आहेत. द इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. मुस्कान ही मॉडेल होती आणि विद्यार्थिनीही होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुस्कानच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांची धाव

मुस्कानच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली, तेव्हा त्यांना ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर त्यांनी मुस्कानला रुग्णालयात नेले, मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. “आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत,” अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त (डीसीपी) अभिषेक गुप्ता यांनी दिली. तपास अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जिममध्ये झाली ओळख, अन्…

मुस्कान दिल्ली विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ओपन लर्निंग’मधून बी.ए.चे शिक्षण घेत होती. सोबतच सोशल मीडियावर एक कंटेंट क्रिएटर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत होती. २०२४ च्या सुरुवातीला घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जिममध्ये तिची ओळख इम्रानशी झाली. इम्रान तिथे ट्रेनर म्हणून काम करत होता.

व्यसन, हिंसा आणि पोलिसांत तक्रार

गेल्या दोन महिन्यांत इम्रानच्या वर्तनात अचानक मोठा बदल झाला. उसने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला. नशेच्या आहारी गेलेल्या इम्रानने मुस्कानला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या जाचाला कंटाळून मुस्कानने पोलिसांत धावही घेतली होती. गैरवर्तणुकीमुळे जिम मालकाने इम्रानला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही दाखल करण्यात आले होते.

चारित्र्यावर संशय अन् वाद

व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आल्यानंतर, २० ऑगस्ट रोजी इम्रानने मुस्कानला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. मुस्कान दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याचा संशय त्याला होता. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यापूर्वी २०२१ मधील एका गुन्हेगारी प्रकरणातही इम्रानवर गुन्हा दाखल झालेला आहे.

घरात एकटी असताना रचला हत्येचा बनाव

बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास इम्रान मुस्कानच्या घरी पोहोचला. तिची आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेली होती, तर दोन बहिणी कामानिमित्त चंदीगडला गेल्या होत्या. घरात मुस्कान एकटीच होती. दरवाजा जबरदस्तीने उघडल्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने मुस्काननेच त्याला ओळखत असल्याने घरात घेतले असावे, असा अंदाज आहे.

घरात प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात इम्रानने आधी मुस्कानचा गळा आवळला आणि सोबत आणलेल्या सुऱ्याने तिच्या पोटावर वार केले. तिची हत्या केल्यानंतर तो तिचा मोबाईल घेऊन फरार झाला.

कामवाल्या बाईच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घरकामासाठी येणाऱ्या महिलेला दरवाजा उघडा दिसला. संपूर्ण घरात अंधार होता, फक्त मुस्कानच्या खोलीतील लाईट सुरू होती. आत जाऊन पाहताच मुस्कान रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली अन् तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

परिसरात कडक पोलीस बंदोबस्त

मुस्कानवर गुरुवारी दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. १५ वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर तिच्या आईने (कमलेश शर्मा) चारही मुलांचा सांभाळ केला. मुस्कानची मोठी बहीण मॉडेलिंग करते, तर लहान भाऊ १८ वर्षांचा आहे. मुस्कानसुद्धा सोशल मीडियाच्या क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवत होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून टिळक नगर भागात पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे.