Delhi High Court Trader Loss Petition: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलने सुरू आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. याविरोधात आता दिल्ली उच्च न्यायालयात वकील आणि व्यापारी संघटनाकडून धाव घेण्यात आली असून त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे. आंदोलनस्थळी एसओपीचा अवलंब व्हावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. आंदोलनासाठी जे निर्बंध लादले आहेत, त्यामुळे जवळपास २,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
वरिष्ठ वकील सचिन पुरी यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने जे नियम घालून दिले आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी आमची मागणी आहे. आमच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आमची मागणी आहे.
अतिरिक्त महाधिवक्ता चेतन शर्मा यांनी सांगितले की, आंदोलनाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आधीच सुनावणी सुरू आहे. मात्र त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील आज होणाऱ्या सुनावणीला विरोध केला नाही.
याबरोबरच दिल्ली उच्च न्यायालय आज नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विनोद जाखर यांच्या याचिकेवरही सुनावणी घेणार आहे. १० ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे आलेल्या आंदोलकांना समाजकंटकांकडून मारहाण करण्यात आली होती, या मारहाणीविरोधात ही याचिका दाखल झाली आहे.
मागच्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टी, डाव्या विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षातील नेते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दक्षिण दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. एसआयआर प्रक्रियेतील घोळ आणि मतदारांची नावे वगळल्याबद्दल ज्ञानेश कुमार यांच्या कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
जंतर मंतरवर आंदोलक निदर्शन करण्यासाठी येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी याठिकाणचे सर्व रस्ते बंद ठेवले आहेत. तसेच आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी, विरोधक आणि सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
