SIR प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर १० ऑक्टोबर म्हणजेच उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी सीजेपीकडून करण्यात आली आहे. या आंदोलनासाठी देशभरातून तरुण वर्ग राजधानी दिल्लीच्या दिशेने निघालेला असतानाच त्यांना ठिकठिकाणी अडवलं जात असल्याचेही आरोप होत आहेत. खुद्द अभिजीत दिपके यांनीदेखील असे प्रकार होत असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाकडून मोठी अपडेट समोर येत असून आंदोलनाच्या काळात राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या आणि दिल्लीहून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे विभागाचा नेमका निर्णय काय?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वे विभागाने नवी दिल्ली व हझरत निझामुद्दीन या दिल्लीतील दोन महत्त्वाच्या स्थानकांवर जाणाऱ्या व या स्थानकांमधून येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या शनिवारी १० ऑक्टोबर रोजी तब्बल १० तासांसाठी रद्द केल्या आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यानुसार, शनिवारी पहाटे ४ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत ही रेल्वे वाहतूक बंद असणार आहे. वरीष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ही माहिती दिली.

असा निर्णय का घेतला? रेल्वे विभाग म्हणतो…

दरम्यान, एकीकडे देशभरातून आंदोलनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांची अडवणूक होत असल्याचा आरोप केला जात असताना दुसरीकडे रेल्वे गाड्याच रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला? यासंदर्भातदेखील संबंधित अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीतील आंदोलनामुळे तिथे दाखल होणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होऊ नये, त्यांची अडचण होऊ नये, म्हणून रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. गुरुवारी याच कारणास्तव जवळपास ५ हजार प्रवाशांना त्यांची ट्रेन वेळेवर गाठता आलेली नाही, असंदेखील रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

“सीएसटी-हजरत निजामुद्दीन २२२२१ क्रमांकाची ही राजधानी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातली माहिती सर्व प्रवाशांना एसएमएसद्वारे देण्यात आली आहे. आत्तापर्यंत फक्त ही एकच गाडी रद्द करण्यात आली आहे. आपल्या दुसऱ्या कोणत्याही गाडीचं वेळापत्रक बदललेलं नाही. कारण त्या गाड्या तिकडे ठरवलेल्या वेळेच्या नंतर दिल्लीला पोहोचतात”, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी एबीपीशी बोलताना दिली.

अभिजीत दिपकेंची खोचक पोस्ट

रेल्वे विभागाने गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी खोचक पोस्ट शेअर केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीच अधिकृत ठरवली आहे”, असं दिपकेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, “मेट्रो बंद, रेल्वे बंद, इंटरनेट बंद.. ५० इंच विश्वगुरू महामानव” अशा आशयाची आणखी एक पोस्ट दिपकेंनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केली आहे.

दिल्ली मेट्रो आज रात्री ९ पासून बंद

दरम्यान, रेल्वेप्रमाणेच मेट्रोबाबतदेखील असाच निर्णय घेण्यात आला असून परिस्थिती सामान्य होईपर्यंत दिल्लीतील सर्व ५७ मेट्रो स्टेशन प्रवासी वाहतुकीसाठी आज रात्री ९ वाजेपासून बंद असणार आहेत. त्यामुळे दिल्लीत जाणाऱ्या व दिल्लीहून निघणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचं दिसून येत आहे.