पीटीआय, नवी दिल्ली
२००२ सालच्या गुजरात दंगलींबाबत बीबीसीने काढलेल्या वृत्तपटाच्या प्रदर्शनावरून दिल्ली विद्यापीठातील कला शाखेच्या इमारतीबाहेर झालेल्या गोंधळाचा तपास करण्यासाठी विद्यापीठाने शनिवारी सात सदस्यांची एक समिती स्थापन केली.दिल्ली विद्यापीठाच्या कुलानुशासक (प्रॉक्टर) रानी अब्बी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीला कुलगुरू योगेश सिंह यांच्याकडे ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसरात शिस्त लागू करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे यांसाठी ही समिती स्थापन करण्यात आल्याचे विद्यापीठाने एका अधिसूचनेत म्हटले आहे. ७ जानेवारीला कला विद्याशाखेबाहेर झालेल्या घटनेची समिती खासकरून चौकशी करणार असल्याचे यात नमूद केले आहे.वाणिज्य विभागाचे प्रा. अजय कुमार सिंह, सह कुलानुशासक प्रा. मनोज कुमार सिंह, समाजशास्त्र विभागाचे प्रा. संजय रॉय, हंसराज महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राम, किरोडीमल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिनेश खट्टर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी गजेंद्र सिंह हे समितीचे इतर सदस्य आहेत.काही विद्यार्थ्यांनी बीबीसीच्या वादग्रस्त वृत्तपटाचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शुक्रवारी दिल्ली विद्यापीठात गोंधळ उडाला होता. पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला होता.