दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तिच्याच गावातील दोन ओळखीच्या तरुणांनी तिला गुंगीचे औषध देऊन तब्बल चार दिवस एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर आलटून-पालटून सामूहिक बलात्कार केला. असे वृत्त ‘न्यूज१८’ वृत्तसंस्थेने प्रसिध्द केले आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान रचला सापळा

पीडित तरुणी उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील राहणारी आहे. सुट्ट्या संपवून ती १५ मे रोजी जाफरबाद रेल्वे स्थानकावरून दिल्लीला जाण्यासाठी निघाली होती. प्रवासादरम्यान तिने तिचा जुना ओळखीचा मित्र शिवम यादव याच्याशी मेसेजवर संपर्क साधला. शिवम आणि त्याचा साथीदार सनी यादव हे दोघेही पीडितेच्याच गावातील आहेत. जेव्हा ट्रेन लखनऊच्या चारबाग स्टेशनवर पोहोचली, तेव्हा शिवम आणि सनी तिथे आले. त्यांनी तरुणीला फूस लावून ट्रेनमधून खाली उतरवले आणि ‘काही वेळ लखनऊमध्ये थांबून पुढे जा’, असे सांगून तिचे मन वळवले.

कॉफीमध्ये दिले गुंगीचे औषध, ४ दिवस अत्याचार

दोघे जण पीडित तरुणीला कॅबने ‘सुशांत गोल्फ सिटी’ परिसरातील एका भाड्याच्या खोलीत घेऊन गेले. तिथे गेल्यावर तिला पिण्यासाठी कोल्ड कॉफी देण्यात आली. ती कॉफी पिताच तरुणीला चक्कर येऊ लागली आणि ती बेशुद्ध पडली.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, १५ आणि १६ मे च्या रात्री या दोघांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. एवढेच नाही तर, त्यानंतरच्या दोन दिवसांत त्यांनी एका तिसऱ्या अनोळखी व्यक्तीलाही तिथे बोलावले आणि त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. कोणाला काही सांगितल्यास जिवंत मारण्याची धमकीही तिला देण्यात आली होती.

रेल्वे स्टेशनवर सोडून आरोपी फरार

चार दिवस नराधमांच्या तावडीत अडकलेल्या या तरुणीला १८ मे रोजी आरोपींनी पुन्हा चारबाग रेल्वे स्टेशनवर आणले. तिला जनरल तिकीट काढून देऊन प्लॅटफॉर्मवर सोडून ते पळून गेले. तरुणीने कशीबशी दिल्लीची ट्रेन पकडली.

हेल्पलाइनमुळे मिळाली मदत

प्रवासादरम्यान तरुणीने हिंमत दाखवून आपल्या कुटुंबाला आणि रेल्वे हेल्पलाइन नंबर १३९ वर फोन करून घडलेला प्रकार सांगितला. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तात्काळ याची दखल घेतली. १९ मे रोजी ट्रेन दिल्लीच्या आनंद विहार स्टेशनवर पोहोचताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर वैद्यकीय उपचार आणि तपासणी करण्यात आली.

पोलिसांची कारवाई आणि तपास सुरू

दिल्ली रेल्वे पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) नोंदवला होता. गुन्हा लखनऊमध्ये घडल्यामुळे आता हा गुन्हा लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी बॉय आहे, तर शिवम एका कॉफी शॉपमध्ये काम करतो. सध्या हे तिन्ही आरोपी फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.