Uttam Nagar Delhi Tension News: दिल्लीतील उत्तम नगरमध्ये ईद-उल-फित्रपूर्वी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. होळीच्या दिवशी दोन समुदायांच्या संघर्षात एका २६ वर्षीय हिंदू तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर या परिसरात तणाव असून, आता या परिसरात ‘खून की होली’ खेळण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे स्थानिकांनी सांगत आहेत. यानंतर भीतीच्या सावटाखाली असणारी मुस्लिम कुटुंब परिसर सोडत आहेत.

होळीच्या दिवशी नेमकं घडलं काय?

भागात अद्याप तणाव असून, ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येत असलेल्या धमक्या विचारात घेता अनेक मुस्लिम कुटुंब परिसर सोडत आहेत. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत माघारी न येण्याचा निर्णय काही मुस्लिम कुटुंबांनी घेतला आहे. ०४ मार्च रोजी ११ वर्षीय मुलीने फेकलेला पाण्याचा फुगा मुस्लिम महिलेला लागल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. यानंतर चार दिवसांनी झालेल्या वादात २६ वर्षीय तरुण कुमार याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह १४ जणांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. 

परिसरात भीतीचे वातावरण

उत्तम नगरमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय जमील अहमद यांनी येणाऱ्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. रेस्टॉरंट मालक जमील या भागात ५० वर्षांपासून राहत असल्याचे त्यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले. “दोन कुटुंबातील जुना वाद असून, काही नेते आता खून की होली खेळण्याचा इशारा देत आहेत. दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची किंमत आम्हाला मोजावी लागते का अशी भीती निर्माण झाली आहे”, असे अहमद हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाले.

घटना धार्मिक वाद नाही – स्थानिक

“मला तीन मुले आहेत आणि सात नातवंडे आहेत. आम्ही सर्वजण घाबरलो आहोत, कारण अनेक नेते खून की होली खेळू अशा धमक्या देत आहेत. आम्हाला इतर कुठेही जाण्याचा पर्याय नाही”, असेही अहमद म्हणाले. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या नेत्यांनी धमक्या दिल्याचे अहमद म्हणाले. ही घटना धार्मिक वाद नाही, असेही ते पुढे म्हणाले. 

त्यांनी केलेल्या चुकीची आम्हाला किंमत मोजावी लागते का? याची भीती वाटतेय. आम्ही शांततेत राहतोय. पण, बाहेरचे लोक येऊन धमकी देत आहेत. ईदच्या काळात इथून बाहेर जावे असे मुलं म्हणतायेत, आमच्या घराशेजारी राहणारे कुटुंब केव्हाच निघून गेले आहे, असे अहमद म्हणाले.

पोलिसांचे आवाहन

दिल्ली पोलिसांनी नागरिकांना परिसर न सोडण्याचे आवाहन केले असले तरी सोशल मीडियावर धमकीचे पोस्टर, व्हिडीओ किंवा पोस्ट अद्याप हटविल्या नसल्याची माहिती आहे. पोलिसांनी तणावग्रस्त भागात सुरक्षा वाढवली असून, बॅरिकेड्स लावले आहेत. पण, अनेकजण परिसरात घुसून घोषणाबाजी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जिहादी… देश के गद्दारों को.. अशा घोषणा रोज दिल्या जातात असे स्थानिक म्हणालेत. 

स्थानिकांमध्ये भीती

दरम्यान, परिसरात भडकाऊ घोषणाबाजीने अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यातून धमकीची भाषा वापरल्याचे दिसून येत आहे. वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे ते आम्हाला ईद कशी साजरी करु देतील, दोन कुटुंबातील वादामुळे इतर सर्व अडचणीत सापडले आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून दिली जात आहे. शेजाऱ्यांसोबत संवाद होत नाहीये, सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. आम्हाला परिसर सोडून जायचं नाही, असे मत आणखी एका स्थानिकाने नोंदवले.