Delhi Vishal Mega Mart Fire News : नवी दिल्ली येथील करोल बाग परिसरातील विशाल मेगा मार्ट या मॉलमध्ये शनिवारी (५ जुलै) भीषण आग लागली होती. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यापैकी एक कुमार धीरेंद्र प्रताप (२५) हा यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी करोल बाग येथे राहत होता. कुमार हा आग लागली तेव्हा इमारतीच्या लिफ्टमध्ये होता. आगीमुळे लिफ्ट बंद पडली होती आणि कुमार धीरेंद्र लिफ्टमध्ये अडकला.
धीरेंद्र लिफ्टमध्ये अडकलेला असताना त्याने त्याच्या मोठ्या भावाला एक संदेश पाठवला होता आणि मला वाचव अशी आर्त हाक मारली होती. तसेच त्याने त्याच्या भावाला फोनही केला होता. धीरेंद्रशी बोलणं झाल्यानंतर त्याच्या भावाने पोलिसांकडे मदत मागितली होती. मात्र, वेळेत मदत मिळू न शकल्याने धीरेंद्रचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या भावाने केला आहे.
जीव वाचवण्यासाठी धीरेंद्रची भावाला आर्त हाक
धीरेंद्र हा वाराणसीवरून दिल्लीला यूपीएससीची तयारी करण्यासाठी आला होता. शनिवारी संध्याकाळी तो विशाल मेगा मार्टमध्ये खरेदीसाठी गेला होता. ६.५१ वाजता त्याने त्याचा भाऊ वीरेंद्र विक्रम याला व्हॉट्सअॅपवर एक संदेश पाठवला होता. त्यात धीरेंद्रने म्हटलं होतं की “मी लिफ्टमध्ये अडकलो आहे आणि मला श्वास घेताना त्रास होतोय, जीव गुदमरतोय.” त्यानंतर त्याने भावाला फोन केला. तो भावाला म्हणाला, “दादा मला वाचव, मी लिफ्टमध्ये अडकलो आहे. माझा जीव गुदमरतोय.”
दुकानातील कर्मचारी वीज बंद करून निघून गेले, वीरेंद्र विक्रमचा आरोप
एएनआय या वृत्तसंस्थेने यासंबंधी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की वीरेंद्र विक्रम याला त्याच्या भावाचा फोन आल्यानंतर त्याने ताततडीने पोलिसांना फोन केला. मात्र, त्याला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. वीरेंद्र म्हणाला, “पोलीस रात्री ९ वाजता घटनास्थळी पोहोचले. तोवर आम्ही केवळ मदतीसाठी वाट पाहत होतो. विशाल मेगा मार्टमधील कर्मचाऱ्यांनी देखील आमची कुठल्याही प्रकारे मदत केली नाही. उलट त्यांनी स्टोरमधील वीज बंद केली आणि ते तिथून निघून गेले. दुकानाचं व्यवस्थापन बेजबाबदारपणे वागलं.”
वीरेंद्र विक्रमने म्हटलं आहे की “रात्री २.३० वाजता दुकान व्यवस्थापनाने मान्य केलं की लिफ्टमध्ये कोणीतरी अडकलेलं असू शकतं. तोवर खूप उशीर झाला होता. पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्री मदतकार्य सुरू केलं आणि सकाळी धीरेंद्रचा मृतदेह लिफ्टमधून बाहेर काढला. त्याचा मृतदेह पाहिला तेव्हा त्याच्या नाकातून रक्त वाहिल्याचं दिसत होतं. त्याने जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचं दिसत होतं. तो शेवटी तडफडून गेला.”