Delhi Vivek Vihar Fire : दिल्लीतील विवेक विहारमध्ये रविवारी लागलेल्या भीषण आगीत एका लहान मुलगा आणि चार महिलांसह किमान नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतरचे हृदयद्रावक वास्तव समोर आले असून, एका व्हिडिओमध्ये पीडितांचे जळालेले अवशेष आणि त्या चार मजली निवासी इमारतीचे कोळसा झालेले दृश्य दिसत आहे.
VIDEO मध्ये काय दिसतंय?
व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्यावर पाणी मारताना आणि धुरामुळे काळ्या पडलेल्या भिंती दिसत आहेत. पीडितांचे मृतदेह बॉडी बॅगमध्ये ठेवल्याचेही चित्रात दिसत आहे. इमारतीच्या मागील भागात आग लागली होती. इमारतीत मध्यभागी फक्त एकच जिना होता. फर्निचरमुळे ही आग वेगाने पसरली.
घट्ट मिठी मारलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
प्राथमिक अंदाजानुसार, एसी ब्लास्टमुळे (AC blast) ही आग लागल्याचा संशय आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका खोलीला सेंट्रल लॉकिंग सिस्टिम होती. शॉर्ट सर्किटमुळे हे लॉक जाम झाले. दरवाजा तोडून आत गेल्यावर बेडवर मृतदेह पडलेले आढळले. बचावकर्त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळला जिने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली होती. “आम्ही जे पाहिले ते अत्यंत अस्वस्थ करणारे होते”, असं अधिकाऱ्याने सांगितलं.
तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून दोन महिलांनी आपला जीव वाचवला, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने सुमारे १० ते १५ जणांना सुखरूप बाहेर काढले. दुसऱ्या मजल्यावरून ५ मृतदेह, पहिल्या मजल्यावरून १ आणि पायऱ्यांच्या वरच्या बंद खोलीतून (Staircase mumty) ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, या घटनेमुळे त्यांना खूप दुःख झाले आहे. “अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते. या दुःखाच्या प्रसंगी, पीडित कुटुंबांप्रति माझ्या संवेदना आहेत. हा कठीण काळ सहन करण्याची शक्ती देव त्यांना देवो”, असं त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, शोकाकुल कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.
