इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली आहे. दिल्लीत घडलेल्या या घटनेत ५२ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. नेहा वर्मा असं या महिलेचं नाव असून मुखर्जी नगरमधील निरंकारी कॉलनीत वास्तव्यास होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती इमारतीमध्ये येत असल्याचं दिसताच महिलेने इमारतीवरुन उडी मारली.

नेहा वर्माने पती धरम वर्मा गाडीतून इमारतीकडे येत असल्याचं दिसल्यानंतर छतावरुन उडी मारली. यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. नेहा वर्मा पतीसोबत याच इमारतीत राहत होती. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून दोघेही अमेरिकेत राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांपत्याला घटस्फोट घ्यायचा होता. इमारतीवरुन उडी मारण्याआधी नेहा वर्माने पतीला “आय लव्ह यू” मेसेज पाठवला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही आणि महिलेच्या मोबाईलची चाचपणी करत आहे. त्यांची मुलं दिल्लीत पोहोचल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.