एका ३० वर्षीय महिलेने प्रियकराच्या मदतीने मिळून नवऱ्याची हत्या केली व करोना व्हायरसमुळे मृत्यू झालाय असे दाखवण्याचा प्रयत्न केला. उत्तरपूर्व दिल्लीतील अशोक विहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली. मृत पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना स्थानिकांनी पोलिसांना सर्तक केले. त्यानंतर पोलिसांनी लगेच पावले उचलत अंत्यसंस्कार थांबवले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यातून श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

शरत दास (४६) असे मृताचे नाव असून अशोक विहारमध्ये त्यांचे छोटेसे दुकान आहे. दोन मे रोजी सकाळी उठल्यानंतर अनिताने शेजाऱ्यांना सांगितले कि, “आपले पती निपचित पडले असून कुठलीही हालचाल करत नाहीयत. करोना व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा शक्यता तिने बोलून दाखवली.” शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. Covid-19 मुळे मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.

दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी नेमकं काय घडलं? त्याबद्दल अनिताकडे विचारणा केली. अनिता पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. शरत दास आजारी नव्हते, त्यांची प्रकृती चांगली होती असे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. Covid-19 च्या चाचणी संदर्भात पोलिसांनी रिपोर्ट दाखवायला सांगितला, तेव्हा अनिताकडे कुठलेही कागदपत्र नव्हते.

आणखी वाचा- शिमला : रशियन प्रेयसीसोबत होता लग्नाचा प्लॅन, पण ट्रकमधून लपून जात असताना…

चार मे रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून गुदमरुन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अनिताला चौकशीसाठी बोलावले. पोलीस चौकशीत अनिता कोसळली व तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपले दुसऱ्या एका व्यक्तीवर प्रेम आहे. नवऱ्यापासून सुटका करुन घेण्यासाठी त्याची हत्या केल्याचे तिने कबूल केले.

शरतला अनिताच्या प्रेमसंबंधांबद्दल माहित होते. त्यावरुन त्यांच्यात सतत भांडणे सुद्धा व्हायची. पतीकडून चांगली वागणूक मिळत नव्हती असे तिने चौकशीत सांगितले. एक मे रोजी रात्री शरत झोपल्यानंतर तिने प्रियकर संजयला घरी बोलावले. त्यानंतर दोघांनी ब्लॅंकेटच्या सहाय्याने गळा आवळून शरतची हत्या केली.