मुंबई म्हटलं की चटकन डोळ्यांसमोर येतो तो वडापाव. वडापाव आणि मुंबईचं नातं आहे. आजकालच्या भाषेत OG वडापाव खायचा असेल तर त्यासाठी मुंबईतच यावं लागेल. गोड, तिखट चटणी, त्यानंतर सुकी चटणी पावाला लावून मधे वडा ठेवून तो वडापाव मुंबईकर गेल्या अनेक वर्षांपासून खात आहेत. हे सगळं सांगायचं कारण मुंबईतला २० रुपयांचा वडापाव खाण्यासाठी एका दिल्लीकर तरुणीने १५ हजार रुपये खर्चून विमान प्रवास करत मुंबई गाठली आहे. या तरुणीने एक इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या तरुणीने हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.
तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओत काय म्हटलं आहे?
या तरुणीनेने इन्स्टाग्राम पोस्ट करत म्हटलंय की मी दिल्लीहून १५ हजारांचं विमान तिकिट घेऊन मुंबईत आले आहे. त्याचं कारणही तेवढंच खास आहे. मला मुंबईतला ओजी म्हणजेच अस्सल वडापाव खायचा आहे. मी दिल्लीत जो वडापाव खाते तो त्याची चव मला आवडत नाही. मग मला अनेकांनी सांगितलं की तुला ओजी वडापाव खायचा असेल तर मुंबईत जाशील तेव्हा खा. त्यामुळे मी खास विमान प्रवास करुन मुंबईत आले आहे.
२० रुपयांच्या वडापावसाठी १५ हजारांचा खर्च
मुंबईत २० रुपयांमध्ये मिळणारा वडापाव खाण्यासाठी या महिलेने १५ हजार रुपये खर्च केल्याचं तिच्या व्हिडीओत सांगितलं आहे. ही महिला सांगते मुंबईत येण्यासाठी मी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. ५ हजार रुपये खर्चून तिकिट घेतलं. त्यानंतर मी विमानाची वाट बघत होते. दिल्ली विमानतळावर मी १६५ रुपये खर्चून चहा प्यायले. त्यानंतर ४ वाजता फ्लाईट आलं. फ्लाईटमध्ये ३०० रुपये खर्चून मी मॅगी कप नूडल्स खाल्ले कारण मला भूक लागली होती. ७ वाजता मी मुंबईत उतरले. मग मला मुंबईतल्या वाहतूक कोंडीमुळे ११ किमी अंतर जाण्यासाठी जवळपास सव्वा तास लागला. तिथे मी हॉटेलसाठी ४ हजार रुपये प्रति दिवस या दराने रुम बुक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑनलाइन वडपाव मागवेन असं ठरवलं होतं. पण नंतर विचार केला की रस्त्यावर जाऊन वडापाव खाण्यात जास्त मजा आहे. त्यानंतर मी वडापाव खाल्ला जो फक्त २० रुपयांचा होता. संपूर्ण प्रवासात माझे १५ हजार रुपये खर्च झाले. मी वडापावचा पहिला घास जेव्हा मुंबईत खाल्ला तेव्हा मला हे जाणवलं होय वडापाव खावा तर इथलाच. १५ हजार रुपये मी घालवले खरे पण मी हे सांगू इच्छिते की मी माझ्या आयुष्यातला बेस्ट वडापाव खाल्ला. असं या महिलेने म्हटलं आहे. ज्यानंतर या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
नेटकरी नेमकं काय म्हणाले?
महिलेच्या या व्हायरल व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने म्हटलंय की, याला म्हणतात श्रीमंत लोकांचं स्ट्रगल, दुसरा युजर म्हणतो मी पण दिल्लीत राहतो, मुंबईतल्या वडापावची आठवण येते. पण मी या तरुणीएवढा क्रेझी नाही. आणखी एक युजर म्हणाला ही १५ हजार खर्च करुन आली आहे. हिला इथला वडापाव आवडला नाही तरीही मस्तच मिळाला म्हणणार, तिच्याकडे पर्याय काय आहे? अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटत आहेत.
