दिल्लीतील दाम्पत्याच्या हत्येचे गूढ अखेर उकलले असून त्यांच्याच मुलीने संपत्तीच्या वादातून दोघांची हत्या केली. प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने तिने या दोन्ही हत्या केल्या असून हत्या करताना तिची दोन्ही लहान मुलं घरातच होती. देविंदर कौर उर्फ सोनिया (वय 26) आणि प्रिन्स दीक्षित (वय 29) अशी आरोपींची नाव असून त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

दिल्लीतील चंदर विहारमध्ये राहणारे गुरमित सिंग (वय 54) हे 21 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाले. यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच 2 मार्च रोजी त्यांची पत्नी जागिर कौर (वय 46) या देखील बेपत्ता झाल्या. त्यांची मुलगी देविंदर कौरने पोलिसांकडे आई- वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केला होती. 8 मार्च रोजी सिंग दाम्पत्याच्या घरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका तलावात सुटकेस तरंगताना आढळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुटकेस उघडली. यात एका महिलेचा मृतदेह होता. प्राथमिक चौकशीत हा मृतदेह जागिर कौर यांचा असल्याचे उघड झाले. जागिर यांचे पती देखील बेपत्ता असल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तलावात शोध घ्यायला सुरुवात झाली. तलावात आणखी एक सुटकेस पोलिसांना सापडली आणि या सुटकेसमध्ये गुरमित सिंग यांचा मृतदेह होता.

पोलिसांनी संशयाच्या आधारे देविंदरची चौकशी केली आणि अखेर या हत्याकांडाचा उलगडा झाला. देविंदर ही 2017 मध्ये पतीपासून विभक्त झाली असून तिला दोन लहान मुलं आहेत. पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर ती प्रिन्स दीक्षित या तरुणाच्या संपर्कात आली. प्रिन्सची नोएडाच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. हळूहळू या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. देविंदरची नजर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर होती.

गुरमित सिंग हे गेल्या वर्षी दुबईतून परतले होते आणि त्यांनी दिल्लीत फर्निचर विक्रीचा व्यवसाय देखील सुरु केला होता. त्यांना दोन मुले आणि आणखी एक मुलगी आहे. सिंग यांचे दिल्लीत 1100 चौरस फुटांच्या जागेवर एक मजली घर होते. या घरावरच गुरमितची नजर होती. यासाठी तिने प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांची मदत घेतली. 21 फेब्रुवारी रोजी रात्री तिने गुरमित यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. ते झोपल्यानंतर त्यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून तलावात फेकून दिला. 21 फेब्रुवारी रोजी जागिर या घरी नव्हत्या. त्या पंजाबमध्ये गावी गेल्या होत्या. गावावरुन परतल्यानंतर देविंदर उर्फ सोनियाने जागिर यांची देखील तशाच पद्धतीने हत्या केली आणि त्यांचा मृतदेह देखील त्याच तलावात फेकला. ज्या घरासाठी देविंदरने आई- वडिलांची हत्या केली, त्याची किंमत 50 लाख रुपये इतकी असल्याचे समजते. हत्या झाली, तेव्हा तिची दोन्ही मुलं घरातच होती, पण ते दोघे दुसऱ्या खोलीत झोपले होते, अशी माहिती पोलिसांनी सांगितले.