नवी दिल्ली : देशभरातील ४४७ जिल्ह्यांमध्ये प्रदूषण मोजण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या पीएम-२.५चे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक असल्याचे एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईए) या स्वतंत्र संशोधन संस्थेचा अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये पीएम-२.५चे सर्वाधिक प्रमाण दिल्लीमध्ये आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर चंडीगड आहे.

सीआरईएने उपग्रहाच्या सहाय्याने देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील हवेत आढळणाऱ्या पीएम-२.५च्या मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या वर्षातील आकडेवारीचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. दिल्लीमध्ये पीएम-२.५ची सरासरी घनता प्रति घनमीटर हवेत १०१ मायक्रोग्रॅम आहे, तर चंडीगडमध्ये प्रति घनमीटर हवेत ७० मायक्रोग्रॅम पीएम-२.५ आढळले.

दिल्लीतील पीएम-२.५चे प्रमाण भारतीय मानकांच्या २.५ पट तर जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या तब्बल २० पट आहे. राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानकने (एनएएक्यूएस) आखून दिलेल्या मानकांनुसार प्रति घनमीटर हवेत ४० मायक्रोग्रॅम पीएम-२.५ हे प्रमाण सामान्य आहे. हरियाणामध्ये हे प्रमाण ६३ आणि त्रिपुरामध्ये ६२ इतके आहे. याशिवाय आसाम (६०), बिहार (५९), पश्चिम बंगाल (५७), पंजाब (५६), मेघालय (५३) आणि नागालँड (५२) यांनीही राष्ट्रीय मानक ओलांडल्याचे सीआरईने नोंदवले आहे.

प्रदूषित जिल्ह्यांची संख्या

बिहार – ३८ पैकी ३७

पश्चिम बंगाल – २३ पैकी २२

गुजरात – ३३ पैकी ३२

नागालँड – १२ पैकी ११

राजस्थान – ३३ पैकी ३०

झारखंड – २४ पैकी २१

दिल्ली – सर्व ११

आसाम – सर्व ११

हरियाणा – ७