कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला दिल्लीतील सत्र न्यायालयाने खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सध्या ऑर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सालेमचा पाय आणखी खोलात गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरण आणि १९९५ मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्या प्रकरणात सालेम दोषी असून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, त्याने २००२ मध्ये दक्षिण दिल्लीत ग्रेटर कैलाश भागात राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत जीवाच्या रक्षणासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. याच खटल्याचा निकाल आज आला असून त्यानुसार सालेमला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोर्टात फिर्यादीच्या आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सालेमला शिक्षा सुनावली. तत्पूर्वी २६ मे रोजीच सालेमला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी दिल्लीत अबू सालेमविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अबु सालेम १९९५ मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांची हत्या आणि १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी सिद्ध झाला आहे. यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सालेमच्या अटकेपूर्वी भारत आणि पोर्तुगालमध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. त्यानंतर जेव्हा सालेमला भारतात प्रत्यार्पित करण्यात आले होते. त्यावेळी लिस्बन न्यायालयाने सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही या आधारे प्रत्यार्पण केले होते. सालेमला फाशीची शिक्षा किंवा २५ वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा न देण्यास सरकार राजी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhis tis hazari court pronounced 7 years imprisonment to gangster abu salem for demanding rs 5 crore as protection money from a delhi based businessman
First published on: 07-06-2018 at 15:32 IST