चौथ्या पातळीची टाळेबंदी जारी

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत डेल्टा कोविड १९ विषाणूच्या संसर्गात मोठी वाढ झाली असून तेथे आता पातळी चारची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीला मुदतवाढ दिली असून लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

डेल्टा विषाणूमुळे तेथे अनेक बळी गेले आहेत. अध्यक्ष सिरील रामफोसा यांनी राष्ट्रीय प्रसारणात सांगितले,की २७ जूनपासून नवीन निर्बंध पंधरा दिवसांसाठी लागू होत असून त्यांचा नंतर फेरआढावा घेतला जाणार आहे. अध्यक्षांच्या भाषणाअगोदर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नवे १५,०३६ रुग्ण सापडले असून १२२ जणांचे मृत्यू झाले आहेत.  आर्थिक केंद्र असलेल्या गॉटेंग प्रांतात अतिरिक्त बंधने लागू करण्यात आली असून तेथे संसर्ग साठ टक्के आहे. प्रवास व इतर गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला असून केवळ व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने   ये-जा करण्यास परवानगी दिली आहे.  राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम बंद ठेवले जातील. पन्नास व्यक्तींना अंत्यविधीसाठी येण्यास परवानगी राहील. मुखपट्टी व सामाजिक अंतर हे नियम लागू राहतील.

संचारबंदी रात्री ९ ते पहाटे ४ या काळात लागू राहील. अल्कोहोल विक्रीवर प्रतिबंध लागू करण्यात आले असून अन्नपदार्थ पार्सलने घेण्याची सोय आहे. सर्व उद्योग मात्र पूर्ण क्षमतेने चालू राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या बिटा प्रकारापेक्षा डेल्टा प्रकार जास्त प्रसार होणारा आहे.