डेल्टा प्लस या करोनाच्या अत्यंत चिंताजनक प्रकाराची लागण झालेले जवळपास ४० रुग्ण महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये तुरळकपणे आढळले असल्याचे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

भारतात आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक नमुन्यांची क्रमवारी करण्यात आली त्यामध्ये एवाय.१ या डेल्टा प्लस प्रकाराचे जवळपास ४० रुग्ण महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशामध्ये तुरळकपणे आढळले तरी त्याच्या प्रभावामध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही, असे आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

यानंतर महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणावर तपासणी करून आरोग्यविषयक योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ब्रिटनच्या आरोग्य विभागाने एवाय.१ हा ११ जून रोजी आढळल्याचे सांगितल्यानंतर नमुन्यांचे पूर्वलक्ष्यी प्रभावाने विश्लेषण करण्यात आले, तेव्हा महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्रथम हा प्रकार आढळला.

कर्नाटकमध्ये पहिला रुग्ण

बंगळूरु: कर्नाटकमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस या प्रकाराची लागण झालेला पहिला रुग्ण म्हैसूरमध्ये आढळला आहे, बाधित व्यक्ती कोणतीही लक्षणे नसलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कोणालाही त्याची लागण झालेली नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी बुधवारी सांगितले. या व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, त्याच्या संपर्कात आलेल्या कोणालाही लागण झालेली नाही आणि ही आनंदाची बाब आहे, असेही सुधाकर यांनी म्हटले आहे. करोनाच्या नव्या प्रकारावर राज्य सरकारचे बारकाईने लक्ष आहे आणि राज्यात सहा जनुकीय प्रयोगशाळा स्थापन करण्याचे सरकारने ठरविले आहे, असेही ते म्हणाले.