देशात सध्या हुकूमशाही आणण्याचा डाव असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचारसभेत बोलताना केली.  कागल येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री झालेल्या सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीकास्त्र सोडले.

संसद, घटना, रिझव्‍‌र्ह बँक, न्यायालय अशा सर्व प्रकारच्या घटनात्मक संस्थांवर हल्ला मोदी सरकारने केला आहे. असे होत असेल तर सरकार कोणासाठी चालवले जात आहे हे कळत नाही. देशात हुकूमशाही आणण्याचा यांचा डाव आहे, अशी टीका  पवार यांनी केली. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले,की गेल्या निवडणुकीत चांगले मताधिक्य देता आले नाही, मात्र प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली होती. या वेळी महाडिक यांना एकही मत कमी पडू दिले जाणार नाही. महाडिक यांनी माफी आणि दिलगिरी व्यक्त केली असल्याने आता विषय संपला आहे.

धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांचा समाचार घेतला. ते म्हणाले,  दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी मला राजकारणातील बाळकडू पाजले,  त्यांनी मला आपला राजकीय वारसदार म्हणून घोषित केले होते. आमदार मुश्रीफ यांना त्यांनी वारसदार करून आमदार केले. त्यांचा मुलावर विश्वास नव्हता. हे बाळ किती गुणाचे आहे, ते त्यांना माहीत होते. माझ्यावर केवळ टीका करून दिशा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील,  प्रा. मच्छिंद्र सकटे, बळवंतराव माने,देवानंद पाटील, प्रा. विश्वास देशमुख, डी. जी. भास्कर, प्रवीण काळबर यांची भाषणे झाली.