नवी दिल्ली : दिल्लीच्या पोलीस प्रमुखपदी राकेश अस्थाना यांच्या नेमणुकीबाबत दाखल करण्यात आलेल्या बेअदबीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात दिलेल्या निकालाचे पालन या नेमणुकीत झालेले नाही, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने वकील एम. एल. शर्मा यांची याचिका सुनावणीसाठी नोंद करण्याचे आदेश नोंदणी विभागाला दिले आहेत. आपण राकेश अस्थाना यांच्या नेमणुकीबाबत बेअदबीची याचिका दाखल केली आहे,  शर्मा यांनी सांगितले. त्यावर सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांनी वकिलास सांगितले की, या याचिकेचा अनुक्रमांक ठरवला गेला असेल तर आम्ही त्याची सुनावणी करण्यास तयार आहोत. याचिकेत म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीचे प्रमुख म्हणून पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांनी दिल्ली पोलीस आयुक्तपदी अस्थाना यांची नेमणूक केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंह प्रकरणात दिलेल्या निकालाचा विचार केला तर एखाद्याची पोलीस महासंचालकपदी नेमणूक करायची असेल तर त्या व्यक्तीची सेवा तीन महिने शिल्लक असली पाहिजे असा नियम आहे. १९८४ च्या केडरचे अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक २७ जुलै रोजी करण्यात आली. त्यावेळी ते निवृत्त होण्यास चार दिवस बाकी होते. ३१ जुलै ही त्यांची सेवासमाप्तीची तारीख होती.