Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात २८ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले होते. या एफआयआरमध्ये त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे विविध आरोप करण्यात आले आहेत. मदत करण्याच्या आमिषाने त्यांनी महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक सुखाची मागणी केल्याचाही आरोप या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मदत करण्याच्या मोबदतल्यात दोघींकडून लैंगिक सुखाची मागणी केल्याची धक्कादायक माहिती या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहे. तर, लैंगिक छळाच्या १५ घटना नोंदवल्या असून यामध्ये विनयभंग करणे, स्पर्श करणे आदी अनुचित प्रकारांची नोंद आहे. तसंच, महिला कुस्तीगीरांचा पाठलाग करणे, त्यांना धमकावणे आदी आरोपही करण्यात आले आहेत. दोन्ही एफआयआरमध्ये आयपीसी कलम ३४५ (विनयभंग, प्राणघातक हल्ला किंवा बळजबरी), ३४५ए (लैंगिक छळ), ३४५ डी (पाठलाग करणे) असे गुन्हे ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात नोंदवण्यात आले आहेत. या गुन्ह्यांप्रकरणी आरोपीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येते.

पहिल्या एफआयआरमध्ये सहा कुस्तीपटूंच्या आरोपांचा समावेश आहे. या एफआयआरमध्ये WFI सचिव विनोद तोमर यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. दुसरी एफआयआर अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आली आहे. एफआयआरनुसार या घटना २०१२ ते २०२२ या काळात भारतात आणि परदेशात घडल्या आहेत. “माझी मुलगी पूर्णपणे विचलित झाली असून ती अशांत झाली आहे”, असं अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी एफआयआर नोंदवलं आहे.

हेही वाचा >> कुस्तीपटूंच्या आंदोलनावर पहिल्यांदाच बोलले गीता-बबिताचे वडील, महावीर फोगाट म्हणाले, “मुलींची अवस्था पाहून वाटतंय…”

सहा कुस्तीपटूंचे आरोप काय?

“एकदा मी हॉटेलमध्ये जेवायला जात असताना ब्रिजभूषण सिंह यांनी मला त्यांच्या टेबलवर बोलावले. माझ्या संमतीशिवाय त्यांनी माझ्या छातीवर हात ठेवला. छातीपासून त्यांनी त्यांचा हात माझ्या पोटापर्यंत नेला. असं त्यांनी तीन ते चार वेळं केलं. तसंच, सिंह यांनी कार्यालयात माझ्या तळहातावर, गुडघा, मांड्या आणि खांद्यावर अयोग्य स्पर्श केला. यामुळे मी घाबरले होते. आम्ही बसलेलो असताना ते माझ्या पायांना आणि हातांनी पाय लावत होते. माझा श्वास तपासण्याच्या बहाण्याने त्यांनी माझ्या छातीवर हात ठेवला. त्याचा फक्त स्पर्श करण्याचा हेतु होता”, असा आरोपही एका कुस्तीपटूने या एफआयआरमध्ये केला आहे.

“मी चटईवर झोपले असताना ब्रिजभूषण सिंह माझ्या जवळ आले. त्यांनी माझे टी शर्ट ओढले. माझा श्वास तपासण्याच्या बहाण्याने त्यांनी माझ्या स्तनाला हात लावला. तसंच, फेडरेशनच्या कार्यालयातही सिंह यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. माझ्या भावाला बाहेर उभं राहण्यास सांगितलं. खोलीत मला खेचून त्यांनी माझ्यावर शारिरीक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप दुसऱ्या कुस्तीपटूने केला आहे.

“घरच्यांना फोन लावण्याच्या बहाण्याने ब्रिजभूषण सिंह यांनी मला जवळ बोलावले. अचानक मला मिठी मारली. एवढंच नव्हे तर मला सप्लिमेंट्स पुरवण्याच्या बहाण्याने त्यांनी माझ्याकडून लैंगिक सुखाची मागणी केली”, असा आरोप तिसऱ्या कुस्तीपटूने केला आहे.

“ब्रिजभूषण सिंह यांनी मला बोलावून माझे टी-शर्ट वर खेचले. त्यांनी श्वास तपासण्याच्या बहाण्याने माझ्या स्तनाला आणि पोटाला हात लावला. ते सतत अयोग्य हातभाव करत असत. त्यामुळे नाश्ता, जेवणासाठी आम्ही सर्व मुलींनी एकत्र जाण्याचेच ठरवले होते”, असं चौथ्या कुस्तीपटूने सांगितले.

“फोटो घेण्यासाठी मी शेवटच्या रांगेत उभी असताना ब्रिजभूषण सिंह माझ्या बाजुला येऊन उभे राहिले. त्यांनी माझ्या नितंबावर अचानक हात ठेवला. आरोपीच्या या कृत्याने मी घाबरले. मी तेथून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला जबरदस्ती खेचून माझ्या खांद्यावर हात ठेवला”, असा आरोपही पाचव्या कुस्तीपटूने केला आहे.

“माझ्यासोबत फोटो काढण्याच्या बहाण्याने त्यांनी मला खेचले. त्यांच्यापासून मी दूर जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला धमकावले. जास्त स्मार्ट बनू नकोस. पुढे कोणतीच स्पर्धा खेळू देणार नाही, अशी धमकी सिंह यांनी दिली”, असा आरोप सहाव्या कुस्तीपटूने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demands for sexual favours at least 10 cases of molestation detailed in 2 firs against brij bhushan sgk
First published on: 02-06-2023 at 09:18 IST