नवी दिल्ली : देशातील लोकशाही संपुष्टात आली असून  हुकूमशाहीच्या मार्गावर निघाला आहे. महागाई, बेरोजगारी हे लोकांशी निगडित विषय मांडून केंद्र वा भाजपच्या हुकूमशाहीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यांच्यावर हल्लाबोल केला जातो, त्यांना अटक करून तुरुंगात डांबले जाते, असा घणाघाती शाब्दिक प्रहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

गेल्या ७० वर्षांमध्ये झालेली देशबांधणी भाजप ८ वर्षांमध्ये संपवत आहे. इथे २-४ मोठे उद्योजक आणि २ नेत्यांचे राज्य आहे. देशातील लोकशाहीचा मृत्यू झालेला पाहून कसे वाटते? इथल्या हुकूमशाहीचा आनंद लुटत आहात की नाही?, अशी उपहासात्मक टिप्पणी राहुल यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला केली.

लोकांचे प्रश्न विरोधक मांडण्याचा प्रयत्न करत असले तरी, केंद्र सरकार त्यावर चर्चा होऊ देत नाही. या दडपशाहीची मोठी किंमत भाजपला भोगावी लागेल, लोक शांत बसणार नाहीत. लोक जाब विचारतील याची भाजपला भीती वाटते. म्हणून भाजप विरोधकांना धमकी देतो. पण, धमकी देणारेच घाबरलेले असतात. त्यामुळे मी भाजपच्या दबावाला घाबरत नाही. पंतप्रधान मोदी मला भीती घालू शकत नाहीत, असे प्रत्युत्तर राहुल यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधींनी हुकूमशहा हिटलरशी तुलना केली. हिटलरने देखील निवडणुका जिंकूनच देश ताब्यात घेतला होता. हिटलरने देशातील सर्व संस्था ताब्यात घेऊन जर्मनीत हुकूमशाही राजवट आणली होती. इथेही देश हुकूमशाहीच्या मार्गाने जात आहे. लोकशाही घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेवर चालते पण, इथे सर्व संस्था भाजप आणि संघाने ताब्यात घेतल्या आहेत, प्रत्येक संस्थेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली माणसे पेरली आहेत. ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या संस्थांच्या माध्यमातून देशात आर्थिक मक्तेदारी निर्माण झाली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘सीतारामन केवळ मुखवटा, त्यांना अर्थकारण कळत नाही’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आकडेफेक करतात पण, त्यांना देशातील वास्तव माहिती नाही. सीतारामन निव्वळ मुखवटा आहेत. राज्या-राज्यांनी जीएसटीला विरोध केला होता. सीतारामन यांना अर्थकारणातील काहीही कळत नाही. महागाई, बेरोजगारी अस्तित्वात नाही, करोनामुळे लोकांचा मृत्यू झालेला नाही, चीनने घुसखोरी केलेली नाही, अशी दिशाभूल केली जाते. केंद्र सरकार आणि भाजप सातत्याने खोटे बोलतो. देशातील वास्तव आणि त्यांनी निर्माण केलेला भ्रम यामध्ये फरक आहे, अशी टीका राहुल यांनी केली.