भाजप नेते निर्मल सिंह यांना जम्मू प्राधिकरणाचे निर्देश

जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री, भाजप नेते निर्मल सिंह यांना बेकायदा घराच्या पाडकामासाठी जम्मू विकास प्राधिकरणाने नोटीस बजावली आहे. हे घर पाच दिवसांत पाडावे, असे निर्देश प्राधिकरणाने त्यांना दिले आहेत.

 नगरोटा येथील बन खेड्यात लष्करी दारूगोळ्याच्या उपभांडाराजवळ बांधलेल्या बंगल्यात गेल्या वर्षी २३ जुलैपासून निर्मल सिंह कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संरक्षण विभागाच्या क्षेत्रापासून एक हजार यार्ड परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास सामान्य व्यक्तींना मनाई करणाऱ्या २०१५ च्या अध्यादेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मे २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, तिचे उल्लंघन करून सिंह यांनी या बंगल्याचे बांधकाम केले आहे.

२०१७ च्या सुमारास हे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी लष्कराने आक्षेप घेऊन सिंह यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. बांधकामासाठी सिंह यांनी संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून परवानगीच घेतलेली नाही. यामुळे पाच दिवसांत या बंगल्याचे पाडकाम करावे, असे जम्मू विकास प्राधिकरणाने या नोटिशीत म्हटले आहे. या कालावधीत पाडकाम न केल्यास प्राधिकरण स्वत: कारवाई करेल व पाडकामाचा खर्च आपल्याकडून वसूल करेल, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

जम्मू विकास प्राधिकरणाकडून ८ नोव्हेंबरला नोटीस प्राप्त झाली. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी वकिलांशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेईन. – निर्मल सिंह, भाजप नेते