Demonetisation: नोटाबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का; मोदींचे माजी आर्थिक सल्लागार

महाभयंकर राक्षसी धक्का असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला, अशा शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.

संग्रहित छायाचित्र

नोटाबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटाबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला, अशा शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.

सहा महिन्यांपूर्वीच अरविंद सुब्रमण्यम यांनी मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय हा एक महाभयंकर राक्षसी धक्का होता. या निर्णयामुळे एकाच फटक्यात चलनात असलेल्या ८६ टक्के नोटा परत मागवण्यात आल्या. याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर झाला. खरंतर, आधीपासूनच आर्थिक विकास मंदावला होता. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे यात भर पडली, असे त्यांनी सांगितले. नोटाबंदीच्या अगोदर विकास दर ८ टक्के होता. पण नोटाबंदीनंतरच्या तिमाहीत विकास दर ६.८ वर घसरला, असे त्यांनी सांगितले.’द टू पझल्स ऑफ डिमोनेटायझेशन- पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक’ या पुस्तकात त्यांनी हे मत मांडले आहे.

“ज्यावेळी नोटाबंदीसारखे धक्के बसतात त्यावेळी सगळ्यात जास्त फटका असंघटित क्षेत्राला बसतो. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेच्या आकलनासाठी नेहमीचं मोजमाप लावलं तर आर्थिक विकासाचा दर वाढलेला वाटतो. असंघटित क्षेत्र आकुंचन पावलं तर त्याचा विपरीत परिणाम संघटित क्षेत्रावरही उमटतो आणि तो ही चांगलाच मोठा असायला हवा,” सुब्रमण्यम यांनी नमूद केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Demonetisation note ban draconian monetary shock former economic adviser arvind subramanian

ताज्या बातम्या