PM Modi Address to Nation: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशातील नागरिकांशी संवाद साधला. नारी शक्ती वंदन अधिनियम आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शुक्रवारी लोकसभेत मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान सायंकाळच्या वेळेस देशाला संबोधित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही पहिली वेळ नाही. याआधीच्या दोन्ही टर्ममध्ये अनेकवेळा पंतप्रधान मोदींनी अशापद्धतीने जनतेची संवाद साधत मोठ्या घोषणा केलेल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी शेवटचे संबोधन २१ सप्टेंबर २०२५ रोजी केले होते. जीएसटी बचत उत्सवाची माहिती आणि नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी जनतेसमोर आले होते. त्यापूर्वी १२ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी ते लाईव्ह आले होते. पंतप्रधान मोदींच्या रात्रीच्या संबोधनाबद्दल नागरिकांमध्ये एकप्रकारचे कुतुहल आणि उत्सुकता असते. नोटाबंदीची घोषणा किंवा करोना काळात केलेली लॉकडाऊनची घोषणा असो… या घोषणांचा परिणाम कोट्यवधी जनतेवर झाला होता. त्यामुळे त्यांच्या रात्रीच्या संबोधनांकडे सर्वांचे लक्ष असते.
८ नोव्हेंबर २०१६ नोटाबंदीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता केलेली नोटाबंदीची घोषणा आजही सर्वांच्या मनात ताजी आहे. पंतप्रधान मोदींनी अनपेक्षितरित्या १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा त्याच दिवशी रात्री १२ नंतर कायदेशीर चलन राहणार नाहीत, अशी घोषणा केली होती. आज रात्री १२ नंतर या नोटा केवळ कागदाचा तुकडा असतील, असे त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते. काळा पैसा आणि चलनात असलेल्या बोगस नोटांचा निकाल लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
या घोषणेनंतर पुढील काही महिने भारतात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. जुन्या नोटा बँकेत जमा करून नव्या नोटा मिळवण्यासाठी देशभरात बँकांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. बँकां आणि एटीएमच्या बाहेर रांगांमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. यानंतर भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली.
१५ फेब्रुवारी २०१९ पुलवामा हल्ल्यानंतर संबोधन
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लाईव्ह येत शहीदांना श्रद्धांजली व्यक्त केली होती. या हल्ल्यामुळे देशात उसळलेला संताप मी समजू शकतो, लोकांचे रक्त सळसळत आहे. यावर काहीतरी करावे, अशी देशवासीयांची भावना असून सरकारने सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपल्या सैनिकांच्या पराक्रमावर मला पूर्ण विश्वास आहे. आपला शेजारी देश, जो सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे, त्याला वाटते की, अशाप्रकारचा विध्वंस करून तो भारताला उद्ध्वस्त करू शकतो, पण त्याचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
१९ मार्च २०२० रोजी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन
२०२० च्या सुरुवातीला जगभरात करोना विषाणूच्या संसर्गाचा प्रभाव दिसून आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी १९ मार्च २०२० रोजी देशाला संबोधित करत असताना २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. जनता कर्फ्यू आपल्याला आगामी आव्हानांसाठी तयार करेल, तसेच २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता टाळ्या, थाळी, सायरन वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व फ्रंटल कर्मचाऱ्यांचे आभार मानावेत, असेही आवाहन त्यांनी केले होते.
२४ मार्च २०२० रोजी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा
२२ मार्च रोजीचा जनता कर्फ्यू यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी पुन्हा रात्री ८ वाजता देशाला संबोधित करत असताना २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य व्यक्त करत असताना निदर्शनास आणून दिले की, प्रगत राष्ट्रेसुद्धा या विषाणूवर नियंत्रण मिळवू शकली नाहीत. विषाणूचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे हेच एकमेव प्रभावी शस्त्र आहे.
१४ एप्रिल २०२० लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ
पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिल रोजी पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये ३ मे पर्यंत वाढत असल्याची घोषणा केली.
१२ मे २०२० रोजी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा
करोना महामारीमुळे केलेले लॉकडाऊन, मंदावलेली अर्थव्यवस्था, छोट्या व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी १२ मे २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. १७ मे रोजी करोना लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली होती. “हे पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटी रुपयांचा निधी होतो”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
१२ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ७ ते १० मे २०२५ दरम्यान ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यानंतर १२ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करत या ऑपरेशनची माहिती दिली.
२१ सप्टेंबर २०२५: ‘जीएसटी बचत उत्सव’ योजनेची घोषणा
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला २१ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. “उद्यापासून (२२ सप्टेंबर) जीएसटीमध्ये केलेल्या नव्या सुधारणा लागू होणार आहेत. जीएसटीमध्ये सुधारणा करून अनेक जीवनाश्यक वस्तू आता ५ आणि १२ टक्क्यांच्या करात बसवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मध्यम वर्गाची खरेदी सुखकर होणार आहेच. त्याशिवाय १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केल्यामुळे मध्यम वर्गाची अडीच लाख कोटींची बचत होणार आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले होते.
