८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर देशातल्या ५०० आणि १ हजारच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि भारतीय अर्थव्यवस्थेला खिळ घालणारा ठरला अशी टीका आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ पॉल क्रुगमॅन यांनी म्हटले आहे.

पॉल क्रुगमॅन यांना अर्थशास्त्रातल्या योगदानाबाबत नोबेल या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे, त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले आहे, तसेच या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारचा काळा पैसा आणि भ्रष्टाचार बाहेर आलेला नाहीये, हा निर्णय फसला आहे असेही क्रुगमॅन यांनी स्पष्ट केले आहे.

भारताचा विकासदर सध्याच्या घडीला ६ टक्के आहे, भारतात सर्वात जास्त काम करणारे लोक असून विकास दर इतका कमी असणे हे देशाच्या प्रगतीसाठी योग्य नाहीये असेही क्रुगमॅन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि रिझर्व्ह बँकेलाही मोठा फटका बसला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाचे मूल्य घटले आहे त्यामागेही थोड्या अधिक प्रमाणात नोटाबंदीचा निर्णय कारणीभूत आहे असेही पॉल यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशाचे भलेमोठे नुकसान होईल असे वाटले होते, ते तेवढ्या प्रमाणात घडले नाही ही बाब निश्चितच समधानाची आहे, मात्र नोटाबंदीचा निर्णय तुम्ही घ्या असा चुकीचा सल्ला नरेंद्र मोदींना देण्यात आला असेही क्रुगमॅन यांनी स्पष्ट केले आहे.

आता भारतात जर अधिकाधिक विदेशी गुंतवणूक वाढली तरच अर्थव्यवस्थेला स्थैर्य येण्याची शक्यता आहे. अन्यथा लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, आता आर्थिक प्रगती साधण्याची देशाला निंतात गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. १ जुलैपासून भारतात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यात आला. हा निर्णय योग्य वाटतो आहे तसेच यामुळे देशात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठीही इतर देश पुढे सरसावू शकतात, मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे हे विसरून चालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.