scorecardresearch

भाजप, काँग्रेसकडून माफीची मागणी!

नोटाबंदी वैध असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमताच्या निकालावरून सोमवारी राजकीय चिखलफेक केली गेली. भाजपने राहुल गांधींच्या तर, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माफीची मागणी करत एकमेकांवर आरोप केले.

भाजप, काँग्रेसकडून माफीची मागणी!


नवी दिल्ली : नोटाबंदी वैध असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमताच्या निकालावरून सोमवारी राजकीय चिखलफेक केली गेली. भाजपने राहुल गांधींच्या तर, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माफीची मागणी करत एकमेकांवर आरोप केले.

‘नोटाबंदीची संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवली असून केंद्राच्या निर्णयावर काँग्रेसने सातत्याने आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी तर परदेशातून जाऊन नोटाबंदीवर टिप्पणी केली होती. त्यांनी देशातही नोटबंदीविरोधात मोहीम चालवली होती. आता राहुल गांधी देशाची माफी मागणार का’, असा सवाल भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केला.

‘माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमताच्या निकालाबाबत काहीही बोलत नाहीत. पण, अल्पमतातील न्यायाधीशाच्या असहमतीवर मात्र बोट ठेवत आहेत. राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भात काँग्रेसचे नेते काय बोलत होते? सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा दिल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी मौन धारण केले होते. काँग्रेसने अवैध अर्थकारणातील सहभागी घटकांना प्रोत्साहन दिले, त्यांना संरक्षणही दिले’, असा गंभीर आरोप रवीशंकर प्रसाद यांनी केला.

दहशतवाद्यांचे आर्थिक स्त्रोत बंद झाल्याचा दावा रवीशंकर प्रसाद यांनी केला. ‘काश्मीरमध्ये दगडफेक थांबली आहे, पीएफआयची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. नोटबंदीने ‘टेरर फायनािन्सग’चे कणा मोडून टाकला आहे. नोटबंदी हा दहशतवादाला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे’, असे प्रसाद म्हणाले. नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली असून त्यावरही काँग्रेसने शंका घेतल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला.

‘मोदींनी माफी मागावी’
काँग्रेसने मात्र नोटबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचा न्यायालयाने निर्वाळा दिल्याचा दावा केला. ‘सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीची प्रक्रिया वैध ठरवली असून या निर्णयामुळे अपेक्षित लक्ष्य गाठले की नाही, यावर भाष्य केलेले नाही. अर्थव्यवस्थेतील रोख चलनाचे प्रमाण कमी करणे, अर्थव्यवस्था ‘कॅशलेस’ करणे, बनावट चलनाला आळा घालणे, दहशतवाद संपवणे आणि काळा पैसा बाहेर काढणे, यापैकी एकही उद्दिष्ट केंद्र सरकारला साध्य करता आलेले नाही. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी’, अशी तीव्र टीका काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 02:08 IST

संबंधित बातम्या