scorecardresearch

संसद आवारात ‘अदानी’विरोधात निदर्शने, ‘अदानी मोदी में यारी है..’च्या घोषणा

विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकार आणि अदानी समूहाविरुद्ध संसदेच्या आवारात निदर्शने केली.

dv sansad adani against slogans
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पीटीआय, नवी दिल्ली : विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकार आणि अदानी समूहाविरुद्ध संसदेच्या आवारात निदर्शने केली. खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळय़ाजवळ एकत्र जमून या वेळी ‘अदानी मोदी में यारी है..’, ‘एलआयसी वाचवा’, ‘नहीं चलेगी और बेईमानी, बस करो मोदी-अदानी’ अशा घोषणा दिल्या आणि फलक झळकावले. एलआयसी आणि स्टेट बँकेला वाचवा अशा घोषणाही खासदारांनी दिल्या.

काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, जदयू, सप, माकप, जेएमएम, राजद, आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या पक्षांचे खासदार या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. अदानी समूहाच्या गैरप्रकारामध्ये सामान्य जनतेचा पैसा गुंतलेला आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. अदानी मुद्दय़ावर डावपेच आखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये १६ विरोधी पक्षांची बैठक झाली. ‘आम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेसाठी तयार आहोत, मात्र आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादावर उत्तर द्यावे’ अशी मागणी खरगे यांनी केली. लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेस, तसेच भारत राष्ट्र समितीने नियम २६७ अंतर्गत चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला नाही. मात्र, ते निदर्शनांमध्ये सहभागी झाले. 

गैरप्रकार केलेल्या कंपन्यांमध्ये एलआयसी आणि सार्वजनिक उपक्रमातील बँकांनी ‘जबरदस्ती’ने केलेल्या गुंतवणुकींबद्दल, केवळ संसदेच्या संयुक्त समितीमार्फत किंवा सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी केली तरच या प्रकरणातील सत्य बाहेर येऊ शकते.

– मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

अदानी वादावर संसदेमध्ये चर्चा टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व ते प्रयत्न करतील. या मुद्दय़ावर संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी आणि सत्य बाहेर यायला हवे. हे ‘हम दो आणि हमारे दो सरकार’ आहे असे मी अनेक वर्षांपासून म्हणत आहे. अदानींच्या मागे कोणती शक्ती आहे ते देशाला समजले पाहिजे.

– राहुल गांधी, खासदार, काँग्रेस

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 00:02 IST