डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ञांची पथके नियुक्त केली आहेत. ही पथके राज्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन करतील. हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

“चालू वर्षात एकूण १५ राज्ये/केंद्रशासित प्रदेश डेंग्यूची सर्वाधिक प्रकरणे नोंदवत आहेत; ३१ ऑक्टोबरपर्यंत देशातील एकूण डेंग्यू रुग्णांमध्ये या राज्यांचा वाटा ८६% आहे,” केंद्राने बुधवारी एका अहवालात म्हटले आहे. तज्ञ संघांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे अधिकारी यांचा समावेश असेल. “डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक असलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय पथके नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून डेंग्यूचा सध्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करून राज्य सरकारांना मदत होईल,” असे निवेदन आरोग्य प्रधान सचिव आणि नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सेवा महासंचालकांना पाठवले आहे.

या वर्षी आतापर्यंत दिल्लीत डेंग्यूची १,५३० हून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत, त्यापैकी जवळपास १२०० रुग्ण एकट्या ऑक्टोबरमधले आहेत, जी गेल्या चार वर्षांतील या महिन्यातील सर्वाधिक संख्या आहे. महाराष्ट्रातील पुण्यात, महापालिकेने ऑक्टोबर महिन्यात या आजाराचे १६८ रुग्ण नोंदवले. सप्टेंबरमध्ये शहरात नोंदवलेल्या डेंग्यूच्या १९२ रुग्णांपेक्षा हे प्रमाण कमी असले तरी ही घट किरकोळ आहे.

या आजाराने यापूर्वीच चंदीगडमध्ये ३३ जणांचा बळी घेतला आहे. खरे तर, या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोंदवण्यात आलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही मागील तीन वर्षांतील वार्षिक रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्ड तापाच्या रुग्णांनी भरुन गेले आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आधीच १००० च्या जवळपास आहे. यापैकी जवळपास ६८ टक्के केसेस ऑक्टोबर महिन्यात आल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.