Vistara Airlines Overbooking Fine and Consumer Court Compensation News: कुटुंबासह काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या एका न्यायाधीशाला दिल्ली विमानतळावर धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. काश्मीरहून परतताना न्यायाधीशाच्या कुटुंबाने दिल्लीहून रायपूरला जाण्यासाठी विस्तारा एअरलाईन्सचे तिकीट बुक केले होते. मात्र विमान उड्डाण होण्याआधी न्यायाधीशांना ओव्हरबुकिंगमुळे विमानात बसण्यास मनाई करण्यात आली. कन्फर्म तिकीट असूनही विस्तारा एअरलाईन्सने अपमानास्पदरित्या विमानात न घेतल्यामुळे संबंधित न्यायाधीशांनी ग्राहक आयोगात धाव घेतली, त्यानंतर आयोगाने विस्तारा एअरलाईन्सला मोठा दंड ठोठावला.
ग्राहक आयोगाचे अध्यक्ष प्रशांत कुंडू आणि सदस्य आनंद व्हर्गिज यांच्या खंडपीठाने विस्तारा एअरलाईन्सला १ लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि कायदेशीर खर्चासाठी १०,००० रुपये देण्याचे आदेश दिले. तक्रारदाराला झालेला मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी ही भरपाई देण्यास सांगितले गेले.
आयोगाने १७ जून रोजी हा निकाल दिला. त्यात म्हटले की, ऐनवेळी विमानात बोर्डिंग करण्यापासून रोखल्यामुळे तक्रारदाराच्या कुटुंबाला दिल्ली ते रायपूरपर्यंतचा प्रवास त्याच्याशिवाय करावा लागला. तसेच तक्रारदाराला दोन दिवस दिल्लीतच अडकून पडावे लागले.
विस्तारा एअरलाईन्सने तिकीट रद्द का केले? संबंधित तक्रारदार न्यायाधीशाने कायदेशीर लढा कसा दिला आणि मोठी भरपाई कशी मिळवली? ही सर्व प्रक्रिया जाणून घेऊ.
प्रकरण काय आहे?
तक्रारदाराने ९ मे २०२३ रोजी दिल्ली ते रायपूरचे तिकीट ७,२०४ रुपयांना विकत घेतले होते. मात्र एअरलाईन्सने २८ मे २०२३ रोजी त्यांचे तिकीट परस्पर दुसऱ्या प्रवाशाला ४० हजार रुपयांना विकले. याची माहिती तक्रारदाराला देण्यात आली नाही. कन्फर्म तिकीट असूनही तक्रारदाराला विमानात सीट का दिली नाही? या प्रश्नावर एअरलाईन्सने मौन बाळगले. यावरून कंपनीने चढ्या दराने दुसऱ्या प्रवाशाला तिकीट विकल्याचे निश्चित होत आहे.
आयोगाने पुढे म्हटले की, तक्रारदाराने दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ मे २०२३ रोजी इंडिगो विमानाचे तिकीट बुक करून प्रवास केला. याचा अर्थ विस्ताराने त्यांचे तिकीट रद्द केल्यानंतर त्यांना प्रवासाची पर्यायी व्यवस्था करून दिली नाही. एअरलाईन्सने तक्रारदाराला तिकीटाची चौपट रक्कम परत केली असली तरी हा युक्तिवाद मान्य करण्यासारखा नाही.
तसेच ज्या अर्थी तक्रारदाराला तिकीटाची चौपट रक्कम परत केली याचा अर्थ एअरलाईन्सने दुसऱ्या प्रवाशाला चढ्या दराने तिकीट विकले होते, हे सिद्ध होते, असेही आयोगाने म्हटले आहे.
कुटुंब पुढे निघून गेले
तक्रारदार न्यायाधीशांचे नाव भूपेंद्र कुमार वासनीकर आहे. ते छत्तीसगडमधील जिल्हा न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करतात. वासनीकर यांनी २८ मे २०२३ साठी दिल्ली ते रायपूर प्रवास करण्याठी चार तिकीटे बुक केली होती. काश्मीरहून दिल्ली आणि दिल्ली ते रायपूर असा त्यांचा प्रवास होता. मात्र दिल्लीतून त्यांच्याशिवायच त्यांचे कुटुंबीय परतले.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, चार तिकीटांसाठी त्यांनी २३,१५६ रुपये भरले होते. २८ मे रोजी वासनीकर कुटुंबीय इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणाच्या चार तास आधीच पोहोचले होते. चेक इन काऊंटरवरही ते आधीच पोहोचले होते. मात्र एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बोर्डिंग पास दिला नाही. जवळपास तीन तास वाट पाहिल्यानंतर एअरलाईन्सने केवळ तीनच बोर्डिंग पास दिले. यामुळे वासनीकर यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असे तिघेच रायपूरला आले.
महागडे तिकीट घेऊन प्रवास
कुटुंब पुढे निघून गेल्यानतर वासनीकर यांना दिल्ली विमानतळावरच थांबावे लागले. त्यादिवशी एकही तिकीट उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये एक दिवस घालवावा लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी इंडिगोचे १८,८२३ रुपयांचे तिकीट बुक केले. या दोन दिवसांत त्यांचा राहण्याचा, खाण्याचा वेगळा खर्च झाला.
एअरलाईन्सने काय म्हटले?
ओव्हरबुकिंग ही डीजीसीएची मान्यताप्राप्त व्यावसायिक प्रथा असल्याचे उत्तर विस्तारा एअरलाईन्सने दिले. तसेच तक्रारदाराला त्याच दिवशी इतर फ्लाइटमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सीट उपलब्ध नसल्यामुळे त्यात अपयश आल्याचे कंपनीने म्हटले.
नुकसान भरपाई पुरेशी नाही – आयोग
विमान कंपनीने लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि धोरणांचे पालन केले असले तरी, कन्फर्म तिकीट असूनही तक्रारदाराला विमानात चढण्यास मनाई करण्यात आली, हा महत्त्वाचा प्रश्न होता, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले. आपल्या कुटुंबासह विमानात चढण्यास मनाई केल्यामुळे तक्रारदाराला अनावश्यक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला, असेही त्यात नमूद करण्यात आले. त्यामुळे फक्त नुकसान भरपाई पुरेशी नाही, असेही आयोगाने म्हटले.
अशाच प्रकारच्या तक्रारी असलेल्या ग्राहकांनी मदतीसाठी आपापल्या राज्यातील ग्राहक हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 1915 वर फोन करावा, असे आवाहन ग्राहक मंचातर्फे करण्यात आले आहे.
