साप्ताहिक सुट्टी नाकारल्याने आणि कामाचा होत असणारा जाच सहन न झाल्याने एका महिला कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. ४५ वर्षीय महिलेने एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये तिने हा उल्लेख केला आहे. तिने असं म्हटलं आहे की तिचा सुपरवायझर तिला साप्ताहिक सुट्टीही देण्यास नकार देत होता. तसंच तिच्यावर कामाचा ताण देत होता, तिचा मानसिक छळ करत होता त्यामुळे तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मृत महिलेचं नाव नागेश्वरी असं असून ही घटना कर्नाटकातल्या मैसूरमध्ये घडली आहे.

नेमकी घटना काय?

नागेश्वरी नावाची महिला मैसूरमधल्या एका सुपर मार्केटमध्ये काम करत होती. या ठिकाणी मागच्या अनेक वर्षांपासून ती काम करत होती. या सुपरमार्केटमध्ये डॉली नावाच्या एका सुपरवायझर महिलेची नेमणूक काही महिन्यांपूर्वी झाली आणि नागेश्वरीचा छळ सुरु झाला असं तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. नागेश्वरीने असं म्हटलं आहे की डॉली तिला साप्ताहिक सुट्टीही देत नसे, तसंच तिला कामावरुन बोलणं, टोमणे मारणं, अतिरिक्त कामांचा ताण देणं या सगळ्या गोष्टी करुन मानसिक छळ करत असे. ज्या चुका नागेश्वरीने केलेल्या नाहीत त्यासाठीही तिला शिक्षा दिली जात असे आणि तिचे वीक ऑफ म्हणजेच तिच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या जात असत. नागेश्वरीने आजारी असल्याने तीन दिवस रजा घेतली होती. ज्यानंतर डॉलीने तिला इशारा दिला की पुन्हा असं करशील तर तुला कामावरुन काढून टाकेन. हा सगळा ताण सहन न झाल्याने नागेश्वरीने आयुष्य संपवलं, असं नागेश्वरीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

नागेश्वरीचा पती अशोकने काय सांगितलं?

नागेश्वरीचा पती अशोकने ही माहिती दिली आहे की शुक्रवारी नागेश्वरी जमिनीवर पडली होती. मी तेव्हा घरात नव्हतो. मी तिला बरेच फोन केले, पण तिने फोन घेतला नाही. मला वाटलं की तिला काय झालं तेव्हा घरी आलो आणि पाहिलं तर ती जमिनीवर पडली होती. तिने बहुदा विषारी पदार्थाचं सेवन करुन आयुष्य संपवलं असावं. तातडीने तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही प्रतिसाद दिला नाही. मी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेल्या आरोपांनुसार पोलीस आता पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत असं स्पष्ट केलं आहे.