Denmark warns us over greenland invasion : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रीनलँड हा भूभाग वेळ पडल्यास डेन्मार्ककडून हिसकावून घेऊ अशी धमकीच त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये दिली होती. ग्रीनलँड बेट ताब्यात घेण्याचा विचार आता व्हाईट हाऊसने व्यक्त केला असून यासाठी लष्करी बळाचा वापराचा पर्याय आमच्यासाठी खुला असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. यानंतर डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जर अमेरिकेने ग्रीनलँडवर आक्रमण केले तर सैनिकांना आधी गोळ्या घालाव्या लागतील आणि नंतर प्रश्न विचारावे लागतील असे डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. याचे कारण म्हणजे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाची वाट न पाहता आक्रमण करणार्‍यांवर हल्ला करणे, हे लष्कराच्या १९५२ च्या रूल्स ऑफ एंगेजमेंटनुसार आहे. बर्लिंग्सके (Berlingske) या डॅनिश वृत्तपत्राने लष्कराला देण्यात आलेल्या निर्देशांबद्दल विचारले असता हा नियम अजूनही लागू असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो टेरिटरी असलेल्या ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य समोर आले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट म्हणाल्या की, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की ग्रीनलँडचा ताबा घेणे ही अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीची प्राथमिकता आहे, आणि आर्क्टिक रिजनमध्ये आपल्या शत्रूंना रोखण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची टीम ही हे महत्त्वाचे परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करत आहेत, आणि आर्थातच कमांडर इन चीफ म्हणून अमेरिकन लष्कराचा वापर करणे हा पर्याय नेहमीच उपलब्ध आहे.”

अमरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले आहे की ते डॅनिश आणि ग्रीनलँडिक अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यात भेटणार आहेत. त्यांनी असेही स्पष्ट केले की ट्रम्प यांना हे बेट विकत घ्यायचे आहे आणि लष्करी बळाचा वापर करायचा नाही, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे. दुसरीकडे डेन्मार्कने संवाद गरजेचा असल्याचे नमूद करत अमेरिकन अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे स्वागत केले आहे.

डेन्मार्कने वारंवार सांगितले आहे की ग्रीनलँड हे बेट विक्रीसाठी नाही. तसेच डेन्मार्कच्या पंतप्रधान Mette Frederiksen यांनी सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांना इशाराही दिला होता. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने ग्रीनलँडवर केलेला कोणताही हल्ला म्हणजे नाटो (NATO) आघाडीचा आणि दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून स्थापन झालेल्या सुरक्षेचा शेवट ठरेल.

आर्क्टिक भागात चीन आणि रशिया यांच्या वाढत्या धोक्यांचा पार्श्वभूमीवर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जगातील सर्वात मोठ्या बेटाचा ताबा अमेरिकेकडे असणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे.