Tesla sales decline Europe: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून बहुमान प्राप्त करणाऱ्या एलॉन मस्क यांच्या व्यवसायाला ट्रम्प संबंधाची झळ बसू लागली आहे. मस्क यांची टेस्ला ही कंपनी विजेवर चालणारी वाहने उत्पादित करते. या वाहनांना युरोप आणि अमेरिकेतून मोठी मागणी आहे. मात्र गेल्या काही काळात एलॉन मस्क यांची ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढली. त्याचा फटका आता टेस्लाच्या वाहनविक्रीला बसला आहे. डेन्मार्कमधील आघाडीची बांधकाम कंपनी त्शेर्निंगने आपल्या ताफ्यातील टेस्लाच्या कार कंपनीला परत दिल्या आहेत. टेस्लाच्या वाहनांमध्ये कोणतीही कमरता नाही. पण एलॉन मस्क यांच्यामुळे वाहने परत करत आहोत, असे त्शेर्निंगने म्हटले आहे.
युरोपमध्ये टेस्लाची लोकप्रियता कमी होत आहे. त्शेर्निंगच्या निर्णयामुळे या दाव्याला आणखी बळकटी मिळत आहे. मस्क यांची राजकारणातील सक्रियता वाढल्यानंतर युरोपमध्ये टेस्लाची विक्री कमी झाली असून ब्रँड इमेजला धक्का बसला आहे. मस्क यांचा राजकारणातला सहभाग वाढल्यानंतर टेस्लाची विक्री तर कमी झालीच शिवाय ज्यांच्याकडे आधीपासूनच टेस्लाचे वाहन होते, त्यांनी ते विकण्यास सुरुवात केली आहे. टेस्ला ब्रँडपासून स्वतःला बाजूला करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
युरोपमधील कॉर्पोरेट विक्री हा टेस्लाची वाहने विक्री होण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र मस्क यांच्याविरोधामुळे ही विक्री कमी झाल्याचे इलेक्ट्रेकच्या अहवालात म्हटले आहे. त्शेर्निंगप्रमाणेच युरोपमधील फार्मसी उत्पादनाची साखळी असलेल्या रॉसमन कंपनीनेही मागच्या वर्षी आपल्या ताफ्यातील टेस्लाच्या वाहनांची विक्री केली. तसेच रॉसमनने आपल्या निर्णयाबद्दलचा एक व्हिडीओही सार्वजनिक केला आहे.
त्शेर्निंगने टेस्लाची वाहने परत देताना काय म्हटले?
इलेक्ट्रेकला दिलेल्या प्रतिक्रियेत त्शेर्निंगने म्हटले की, आमच्या कंपनीत कोणत्या गाड्या चालवायच्या याबरोबरच कुणाच्या गाड्या चालवायचा, हाही निर्णय आम्ही घेतो. त्यामुळेच आमच्या कंपनीच्या टेस्ला वाहनांच्या चाव्या परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. टेस्लाच्या गाड्या वाईट आहेत म्हणून हा निर्णय घेतलेला नाही. तर अलीकडच्या काळात एलॉन मस्क यांची वाढलेली राजकीय सक्रियता आणि त्यांच्या विधानांमुळे सदर निर्णय घेतला. तुमच्या राईडबद्दल धन्यवाद, एवढेच आता म्हणू इच्छितो.
त्शेर्निंगने पुढे म्हटले की, राजकीय सक्रियता असलेल्या ब्रँडशी जोडले जाण्यापेक्षा आम्ही एखाद्या युरोपियन कंपनीच्या वाहनांना यापुढे पसंती देऊ.
इलेक्ट्रेकच्या अहवालात टेस्लाच्या युरोपमधील व्यवसायासंदर्भातील स्थितीही दर्शविली गेली आहे. युरोपमध्ये टेस्लाची व्यावसायिक स्थिती अनिश्चित असून अनेक ठिकाणचे स्टोअर बंद करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कर्मचारी कपात करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत मागच्या तीन वर्षांच्या तुलनेतील सर्वात कमी वाहन विक्री झाल्याचेही समोर आले आहे.