Gang Rape in Faridabad : गुडगाव फरीदाबाद रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे. या रस्त्यावर एका २५ वर्षीय तरुणीवर मारुती सुझुकी इको गाडीत सामूहिक अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे ही तरुणी जवळपास तीन तास या गाडीतून ओरडत होती. परंतु, तिचा आवाज इतर कोणालाच ऐकू गेला नाही. आजूबाजूला असलेल्या दाट धुक्यांमुळे दृष्यमानता कमी झाली होती, त्यातच निर्जन वस्ती असल्याने या तरुणीवर दोघांनी अतोनात अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं की, सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आईशी भांडण करून घरातून निघून गेली. मैत्रिणीकडे जातेय असं तिने तिच्या बहिणीला कळवलं होतं. रागाने घरातून निघाली तरी ती रात्री घर परत येणार होती. परंतु, घरी परतताना तिला उशीर झाला. त्यामुळे तिला कोणतीही सार्वजनिक वाहतूक मिळाली नाही. म्हणून तिने एका खासगी गाडीचालकाकडून लिफ्ट घेतली. या गाडीत आणखी काही पुरूष असतील याची तिला कल्पना नव्हती. त्यामुळे या गाडीतील नराधमांनी तिला घरी सोडण्याऐवजी गुडगाव फरीदाबाद रोडकडे नेले. तिथे दाट धुके असल्याने दृष्यमान कमी झाले होते. तिला तेथून हनुमान मंदिराच्या पलीकडे घेऊन गेले. फरीदाबादच्या रस्त्यावरून तिला घेऊन जात असताना ती तरुणी गाडीत तीन तास बंदिस्त होती. या घटनेदरम्यान तिने मदतीसाठी आरडाओरडाही केला. परंतु, रस्त्यावर रहदारी कमी असल्याने तिचा आवाज कोणापर्यंतही पोहोचला नाही.
हॉटेलजवळ अत्याचार अन् गाडीतून दिले फेकून
कुटुंबाने आरोप केला, एसजीएम नगरमधील राजा चौकातील एका हॉटेलजवळ पहाटे ३ वाजण्याच्या सुमारात चालत्या गाडीतच दोघांनी तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती केली. त्यानंतर गाडीतून तिला बाहेर फेकून देण्यात आले.
गाडीतून फेकून देण्यात आल्याने महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. यासाठी तिच्या चेहऱ्यावर १२ टाके पडले आहेत. या घटनेनंतर तिने तत्काळ तिच्या बहिणीशी संपर्क साधला. तिने तिला फरीदाबाद रुग्णालयात नेलं. तिची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी तिला दिल्लीतील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. परंतु, कुटुंबाने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम ७० (१) सामूहिक बलात्कार, ३५१ (३) गुन्हेगारी धमकी, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच गु्न्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी इको गाडीही जप्त करण्यात आली आहे.
