विषारी वायूंचे उत्सर्जन करणारी मुंबईतील देवनार कचराभूमीतील (डंपिंग ग्राऊंड) आग हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगून, या घटनेच्या तपासाकरिता दोन सदस्यांचा विशेष चमू तेथे पाठवण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी सांगितले.

जावडेकर यांनी या मुद्दय़ावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली. या कचराभूमीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराची ‘बेफिकिरी’ या आगीसाठी जबाबदार असल्याचा आरोप करून, या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे जावडेकर म्हणाले.

या घटनेमागे घातपाताची शक्यता आहे काय, असे विचारले असता जावडेकर म्हणाले की, मंत्रालयाच्या चमूने तपासानंतर अहवाल सादर केल्यावर ही बाब स्पष्ट होईल.

दोन सदस्यांचा चमू घटनास्थळाला भेट देऊन एका आठवडय़ात संपूर्ण अहवाल सादर करेल. याबाबत मी मुंबईच्या आयुक्तांशी चर्चा केली असून, अहवाल तयार होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मी बोलेन, असे जावडेकर म्हणाले.

देवनार कचराभूमीला दोन दिवसांपूर्वी लागलेली आग रविवारी सायंकाळी भडकल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा या ठिकाणाहून धूर निघत असल्याचे दिसून आले.