एक्स्प्रेस वृत्तसेवा, जालंधर : सातशेहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी तीन- चार वर्षांपूर्वी ज्या ‘ऑफर लेटर’च्या आधारे ‘स्टडी व्हिसा’ वर कॅनडातील महाविद्यालयांत प्रवेश घेतला होता, ती पत्रे बनावट असल्याचे आढळल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना भारतात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांचा एजंट ब्रिजेश मिश्रा याने या विद्यार्थ्यांसाठी बनावट पत्रे तयार केली आणि ते कॅनडात पोहोचल्यानंतर इतर महाविद्यालयांमध्ये त्यांचे प्रवेश निश्चित करून दिले. या विद्यार्थ्यांनी नंतर त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला व नोकऱ्या मिळवल्या. त्यांनी स्थायी नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर हा घोटाळा उघडकीला आला आणि कॅनडियन सीमा सुरक्षा यंत्रणेने या बनावट पत्रांची माहिती दिली.
बारावीनंतर ‘स्टडी व्हिसा’साठी अर्ज करताना अनेक विद्यार्थी एखाद्या एजंटला किंवा कन्सल्टन्सी फर्मला गाठतात. ते एजंटला आपली शैक्षणिक कागदपत्रे, आयईएलटीएस पात्रता प्रमाणपत्र आणि आर्थिक कागदपत्रे देतात. त्या आधारे सल्लागार एक फाइल तयार करतो, ज्यात विद्यार्थी शैक्षणिक संस्था व अभ्यासक्रम यांबाबत त्यांचा प्राधान्यक्रम नमूद करतात. कन्सल्टन्सीही याबाबत त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देते.