बंगळुरू, कनकपुरा : कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलावरून अजूनही गोंधळ सुरू आहे. पक्षश्रेष्ठींनी या विषयावर अंतिम निर्णय घ्यावा आणि या गोंधळाला पूर्णविराम द्यावा, असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. तर, हा काही मोजक्या व्यक्तींमधील गोपनीय करार आहे, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली.

राज्यातील पक्षनेतृत्वाबद्दल बोलून आपल्याला पक्षाला अडचणीत आणायचे नाही किंवा पक्ष कमकुवतही करायचा नाही, असे शिवकुमार यांनी सांगितले. नेतृत्वबदलासंबंधी मोजक्या व्यक्तींदरम्यान गोपनीय करार झाला आहे, त्यामुळे आपल्याला या मुद्द्यावर जाहीरपणे काहीही चर्चा करावयाची नाही, असा दावाही शिवकुमार यांनी केला.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने २० नोव्हेंबरला अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. सरकार स्थापन झाले तेव्हा सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात सत्तावाटपाचा करार झाला होता, असे बोलले जाते. त्यामुळे २० नोव्हेंबरपासून राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला वेग आला आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांचेही काही समर्थक आमदार काही दिवसांपासून दिल्लीत आहेत.

या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री बदलावरून आपण पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करू, याचा सिद्धरामय्या यांनी मंगळवारी पुनरुच्चार केला. आमदारांनी पक्षनेत्यांना भेटण्यास आणि त्यांच्याकडे आपले मत मांडण्यास आपली काहीच हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळामधील बदलही पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसारच होईल, असे ते म्हणाले.

आमदारांना पक्षश्रेष्ठींकडे आपले जे काही म्हणणे मांडायचे आहे ते मांडू द्या, त्यांना स्वातंत्र्य आहे. आम्ही पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करू. हा गोंधळ थांबवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना निर्णय घ्यावा लागेल. – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

मी मला मुख्यमंत्री करा असे सांगितले नाही. हा पाच ते सहा व्यक्तींदरम्यानचा गोपनीय करार आहे. मला यावर जाहीरपणे काहीही बोलायचे नाही. माझा माझ्या विवेकबुद्धीवर विश्वास आहे. मला कोणत्याही प्रकारे पक्षाला अडचणीत आणायचे नाही. – डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

खरगेंबरोबर चर्चा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काही दिवसांपासून कर्नाटकात होते. या कालावधीत शिवकुमार त्यांना भेटले नाहीत मात्र, खरगे मंगळवारी विमानतळावर जात असताना शिवकुमार त्यांच्याबरोबर होते. त्यापूर्वी सिद्धरामय्या आणि खरगे यांची शनिवारी तासभर चर्चा झाली.