पीटीआय, चंडीगड

डेरा सचा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहिम सिंग मंगळवारी हरियाणाच्या सुनारिया तुरुंगातून २१ दिवसांच्या फर्लोवर बाहेर आला. या काळात तो उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बरनावा येथील डेरा आश्रमात राहणार आहे. सिंग त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याला २०१७मध्ये तुरुंगवास सुनावण्यात आला होता.

गुरमीत सिंगने जूनमध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून २१ दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यासाठी निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती. त्याविरोधात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने यापूर्वी ९ ऑगस्टला असे निरीक्षण नोंदवले होते की कोणत्याही मनमानी किंवा पक्षपाताविना सक्षम अधिकाऱ्यांनी गुरमीत सिंगच्या अर्जाचा विचार करावा.

हेही वाचा >>>Ludhiana Woman Gangrape : संतापजनक! मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतापलेल्या वडिलाने प्रियकराच्या बहिणीसोबत केलं दुष्कृत्य

यापूर्वी, आपल्या परवानगीशिवाय सिंगला पुन्हा रजा मंजूर करू नये असे निर्देश उच्च न्यायालयाने २९ फेब्रुवारीला हरियाणा सरकारला दिले होते. त्याला हरियाणा सरकारने १९ जानेवारीला ५० दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती.