scorecardresearch

भारताशी सहकार्याच्या संबंधांची इच्छा – शरीफ; शुभेच्छांबद्दल मोदींना शाहबाझ यांचे धन्यवाद

‘पाकिस्तान भारताशी शांतता, सौहार्दाचे व सहकार्याचे संबंध राखू इच्छितो,’’ असे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

वृत्तसंस्था, इस्लामाबाद : ‘पाकिस्तान भारताशी शांतता, सौहार्दाचे व सहकार्याचे संबंध राखू इच्छितो,’’ असे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अभिनंदन व शुभेच्छांबद्दल त्यांना धन्यवाद देताना त्यांनी हे सांगितले. शरीफ यांची पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान म्हणून पाकिस्तानी संसदेत सोमवारी बिनविरोध निवड झाली. शरीफ यांच्या शपथविधीनंतर काही मिनिटांतच पंतप्रधान मोदींनी सोमवारी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मोदी यांनी ‘आपल्या नागरिकांत सुख-समृद्धी नांदण्यासाठी आपल्या देशांसमोरील विकासाच्या आव्हानांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी भारतीय उपखंडात दहशतवादापासून मुक्तता, शांतता आणि स्थैर्य स्थैर्य नांदावे,’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

मोदींना उत्तरादाखल प्रतिसाद देताना, शरीफ यांनी ट्विट केले, की पाकिस्तानही भारताशी शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध राखू इच्छितो. जम्मू-काश्मीर प्रश्नांसह दोन्ही देशांतील वादग्रस्त प्रश्नांवर शांततेच्या मार्गाने तोडगा निघणे अपरिहार्य आहे. दहशतवादाशी लढताना पाकिस्तानने केलेला त्याग सर्वाना ठाऊक आहेच. दोन्ही देशांत शांततापूर्ण संबंध राखून, आपापल्या देशांच्या नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर आपण लक्ष केंद्रित करुयात.

इम्रान यांच्यावर टीका

इम्रान खान यांच्या सरकारवर टीका करताना शरीफ यांनी पाकिस्तानी संसदेत सांगितले, की भारताने काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७०  हटवले, तेव्हा इम्रान यांनी गंभीरपणे राजकीय हालचाली-प्रयत्न केले नाहीत. मोदींनी काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून दोन्ही देश गरीबी, बेरोजगारी, औषधटंचाईसारख्या प्रश्नांसह इतर प्रश्नांकडे लक्ष देऊ शकतील.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desire cooperative relations india sharif shahbaz thanks modi best wishes ysh