scorecardresearch

रशिया- युक्रेन युद्धामुळे संबंध बिघडले असतानाही ‘या’ क्षेत्रात अमेरिका घेत आहे रशियाची मदत

रशियाच्या सोयुझ यानातून अमेरिकेचा अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीवर परतणार

Photo Courtesy – NASA Website

युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याला ( Russia Ukraine War ) एक महिना उलटला असून अजुनही युद्ध सुरुच आहे. रशियाने उचलेल्या या पावलाविरोधात जगभरातील विविध देशांनी निषेध केला आहे, अनेकांनी रशियावर निर्बंध टाकले आहेत. या युद्धामुळे रशिया आणि अमेरिकेतील संबंध हे ताणले गेले आहेत. रशियाला अटकाव करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने अमेरिकने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. असं असलं तरी एक क्षेत्र असं आहे की जिथे रशिया आणि अमेरिका हे दोन देश हातात हात घालून परस्पर सहाकर्य करत आहे. जमिनीवर जरी हे दोन्ही देश एकमेकांना पाण्यात बघत असले तरी पृथ्वीपासून ४१७ किलोमीटर उंचीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात ( International Space Station ) मात्र दोन्ही देशांचे उत्तम सहकार्य सुरु आहे.

येत्या ३० तारखेला रशियाच्या सोयुझ या यानातून रशियाचे दोन आणि अमेरिकेचा एक अंतराळवीर हे पृथ्वीवर परतरणार आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला जोडलेल्या Soyuz MS-19 या यानातून पृथ्वीपर्यंतचा हा प्रवास होणार आहे. हे यान कझाकिस्तानमध्ये उतरणार आहे. विशेष म्हणजे याच कझाकिस्तानने रशियाबाबात तटस्थ भुमिका घेतली आहे.

पृथ्वीवर परतणारे अमेरिकेचे अंतराळवीर ( Astronaut ) वॅनडी ही ( Vande Hei ) यांनी या मोहिमेत सर्वात जास्त काळ अवकाश स्थानकात रहाण्याचा अमेरिका देशाशी संबंधित नवा विक्रम केला आहे. वॅनडी ही हे तब्बल ३५५ दिवसांच्या अवकाश स्थानकातील मुक्कामानंतर पृथ्वीवर परतणार आहेत. दरम्यान या काळात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या माध्यमातून तब्बल ५ हजार ६८० वेळा पृथ्वी प्रदक्षणा घातली आहे. तर रशियाचे दोन अंतराळवीर हे सुद्धा दीर्घ मुक्कामानंतर पृथ्वीवर परतत आहेत.

हे तिघे अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यावर लगेच त्यांच्या देशात परतणार नाहीत. कारण अशा अवकाश प्रवासानंतर ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार वैद्यकीय तपासण्या झाल्यावरच हे तीन अंतराळवीर मायदेशी रवाना होणार आहेत. ३० मार्चला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून तीन अंतराळवीर परतल्यावरही आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सात अंतराळवीरांचा मुक्काम कायम असणार आहे. यामध्ये अमेरिका आणि रशियाचे प्रत्येकी तीन अंतराळवीर आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या एका अंतराळवीराचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक काय आहे ?

शीतयुद्ध संपल्यावर परस्पर सहकार्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे बघितलं जातं. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचा पसारा हा चार फुटबॉल मैदाना एवढा असून त्याचे वजन हे ४०० टनापेक्षा जास्त आहे. पृथ्वीपासून सुमारे ४१७ किलोमीटर उंचीवरुन हे अवाढव्य अवकाश स्थानक प्रति सेकंद ७ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने फक्त ९० मिनीटात पृथ्वीप्रदक्षणा पूर्ण करत असते. अमेरिका आणि रशिया या प्रमुख देशांच्या पुढाकाराने या अवकाश स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीमधील ११ देशांसह, जपान, ब्राझील आणि कॅनडा या देशांचाही अवकाश स्थानकाच्या जडणघडणीत वाटा राहिला आहे. भविष्यकाळात पृथ्वीबाहेर अवकाशात वास्तव्य करण्याच्या दृष्टीने विविध वैज्ञानिक प्रयोग हे अवकाश स्थानकात करण्यात येतात. इथल्या वास्तव्याच्या अनुभवाचा उपयोग आणि अवकाश स्थानाकाच्या निमित्ताने विकसित केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर हा भविष्यात अवकाश मोहिमांकरता केला जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Despite disputes us and russia cooperating each other at international space station asj

ताज्या बातम्या