एक्स्प्रेस वृत्तसेवा,नवी दिल्ली
भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन एफआयआरच्या प्रती एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या हाती लागल्या असून त्यामध्ये ब्रिजभूषण सिंहविरोधात अतिशय गंभीर आरोप नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये महिला कुस्तीपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी करण्याच्या किमान दोन घटनांचा उल्लेख आहे, तर किमान दहावेळा विनयभंग केल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
एफआयआरमधील तपशिलांनुसार ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंना कारकिर्दीसाठी मदत करण्याच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची मागणी केल्याच्या किमान दोन घटना आहेत. तर किमान १५ वेळा लैंगिक छळ केल्याचा उल्लेख आहे. त्यापैकी १० वेळा अयोग्य स्पर्श, विनयभंग यांच्या घटनांचा समावेश आहे. त्यामध्ये वक्षस्थळावरून हात फिरवणे, नाभीला हात लावणे, पाठलाग करण्यासह घाबरवण्याचे अनेक प्रसंग या कुस्तीपटूंनी नोंदवले आहेत. यामुळे या महिला खेळाडूंना भीती आणि मानसिक आघात यांचा सामना करावा लागला. त्यांच्या छळवणुकीमुळे मुली कोठेही एकत्रित जात असत, असेही तक्रारीत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिलला ब्रिजभूषण यांच्याविरोधात हे दोन एफआयआर नोंदवले. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
ब्रिजभूषणने कुस्तीपटूला पौष्टिक पोषक आहार देण्याचे आश्वासन देऊन त्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे. या कुस्तीपटूने महत्त्वाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी तिला स्वत:च्या खोलीत बोलावले आणि पलंगावर बसायला लावले. त्यानंतर तिच्या संमतीशिवाय तिला जबरदस्तीने मिठी मारली. वर्षांनुवर्षे हे लैंगिक छळाचे आणि अशोभनीय वर्तनाचे प्रकार वारंवार घडत होते. त्यामुळे ही कुस्तीपटू मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ झाली आणि घाबरू लागली.
भारतीय दंड सहितेची कलमे ३५४, ३४, पोक्सो कायद्याचे कलम १० याअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना एक ते तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. पहिल्या एफआयआरमध्ये सहा सज्ञान कुस्तीपटूंच्या आरोपांचा समावेश आहे. त्यामध्ये जागतिक भारतीय कुस्तीगीर महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. दुसरी एफआयआर अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दाखल केली आहे.
‘खाप महापंचायती’कडून अटकेची मागणी
कुरुक्षेत्र (हरियाणा) : काही महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची मागणी येथील ‘खाप महापंचायत’ने शुक्रवारी केली. ‘महापंचायत’नंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले की, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष सिंह यांना अटक करावी. यासाठी सरकारला ९ जूनपर्यंत मुदत देत आहोत. अन्यथा देशभरात ‘महापंचाईती’चे आयोजन करून आंदोलन तीव्र केले जाईल आणि कुस्तीपटू ‘जंतरमंतर’वर पुन्हा एकत्र येतील, असे ते म्हणाले.
विविध खाप आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी शुक्रवारी हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी भागांतून ‘जाट धर्मशाला’ येथे पोहचले आहेत