Devaki Jain’s participation in CJP protest : वयाची ९३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अन्यायाविरोधात आणि नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त देवकी जैन यांनी शुक्रवारी दिल्लीतील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या तिरंगा मोर्चात सहभाग घेतला. नर्मदा बचाव आंदोलनापासून माहितीच्या अधिकाराच्या चळवळीपर्यंत विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या जैन यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांसाठीचा लढा सुरूच राहायला हवा, असे म्हटले. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
नवी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात झालेल्या या आंदोलनात तरुण पिढीही संविधानिक हक्कांसाठी आवाज उठवत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे जैन यांनी सांगितले. नव्या पिढीने अशा मुद्द्यांसाठी लढण्याचा निर्णय घेतल्याचे पाहून समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘नर्मदा आंदोलनातील दिवसांची आठवण झाली’
अर्थशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापक असलेल्या देवकी जैन यांनी आपल्या जुन्या आंदोलनांच्या आठवणींना उजाळा दिला. आंदोलनांदरम्यान दिल्या जाणाऱ्या ‘झिंदाबाद’च्या घोषणांबद्दल आपल्याला विशेष जिव्हाळा असल्याचे त्यांनी सांगितले. नर्मदा धरणाचे बांधकाम सुरू असताना आंदोलनकर्त्यांसोबत अनेक मैल चालल्याची आठवणही त्यांनी सांगितली. आजची तरुण पिढी संविधानिक अधिकारांसाठी लढताना दिसल्याने जुन्या चळवळींची आठवण झाल्याचे जैन म्हणाल्या.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा
१६ ऑक्टोबरच्या ‘सीजेपी’च्या आंदोलनात सहभागी होण्यामागील भूमिका स्पष्ट करताना जैन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पदावरून हटवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. सरकारने कथित भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठिंबा देणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनमताबाबत किती संवेदनशील आहेत, हे आपल्याला माहीत नसल्याचे सांगत, लोकांमध्ये सरकार लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना निर्माण होऊ शकते, असेही जैन यांनी म्हटले. सरकारच्या आर्थिक धोरणांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आपल्या जुन्या काळातील आंदोलनांची आठवण काढत जैन यांनी आजच्या आंदोलनांवरील पोलिसांच्या भूमिकेवर भाष्य केले. “तुम्हाला अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, याचाच अर्थ आपली लोकशाही अजूनही कार्यरत आहे आणि नीट काम करत आहे. आमच्या काळात तर आंदोलनादरम्यान आम्हाला थेट अटक केली जायची,” अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या आणि भूतकाळातील परिस्थितीची तुलना केली.
‘सीजेपी’च्या आंदोलनामागील पार्श्वभूमी
मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ‘सेजेपी’ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वेळी संघटनेच्या नेत्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांच्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.
‘सीजेपी’चे नेते सौरव दास आणि आशुतोष रंका यांना याच आठवड्यात ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थही हे आंदोलन आयोजित करण्यात आले. जंतरमंतर हे आंदोलनासाठीचे अधिकृत ठिकाण राहिले नसल्याने संघटनेने दिल्लीतील सेंट्रल पार्क येथे आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. शुक्रवारी आणि शनिवारी येथे आंदोलक जमणार असल्याचे संघटनेने जाहीर केले होते.
