व्हॅटिकन सिटी : देवसहायम पिल्लई यांना ख्रिश्चन धर्मातील संतपद बहाल करण्यात आले. रविवारी व्हॅटिकन सिटी येथे झालेल्या दिमाखदार धार्मिक सोहळय़ात सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी पिल्लई यांना हे पद बहाल केले. पिल्लई यांनी १८ व्या शतकात ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. संतपद मिळणारे ते पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत. गेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदा ‘व्हॅटिकन’मध्ये संतपद प्रदान सोहळा झाला. देवसहायम यांच्यासह चार महिलांसह नऊ जणांना या सोहळय़ात संतपद बहाल करण्यात आले.

८५ वर्षीय पोप फ्रान्सिस यांनी रविवारी ‘व्हॅटिकन’मधील सेंट पीटर्स बॅसिलिका येथे आयोजित केलेल्या संतपद प्रदान सोहळा व प्रार्थना सभेत पिल्लई यांना संत घोषित केले. उजवा गुडघा काही महिन्यांपासून दुखावल्याने पोप यांनी चाकाच्या खुर्चीत बसून सोहळय़ात मार्गदर्शन केले.

देवसहायम यांना ‘स्वर्गस्थ आत्मा’ म्हणून संतपद मिळण्याआधीची प्रक्रिया ‘व्हॅटिकन’ने २००४ मध्येच कोट्टर धर्मक्षेत्र, तमिळनाडू बिशप परिषद आणि भारतीय कॅथोलिक बिशप परिषदेच्या विनंतीवरून केली होती. देवसहायम यांच्या अलौकिक कार्यास पोप फ्रान्सिस यांनी २०१४ मध्येच मान्यता दिल्याने त्यांच्या संतपदाचा मार्ग मोकळा झाला होता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे. या वेळी भारतीयांच्या समुदायाने तिरंगा ध्वज फडकावत आनंदोत्सव साजरा केला. 

देवसहायम कोण आहेत?

देवसहायम यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ रोजी हिंदूू नायर कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव नीलकंठ पिल्लई होते. ते तत्कालीन त्रावणकोर राज्याचा भाग असलेल्या कन्याकुमारी येथील नट्टालम येथील रहिवासी होते. त्रावणकोरचे महाराजा मरतड वर्मा यांच्या दरबारात अधिकारी होते. डच नौदल कमांडरने त्यांना कॅथलिक ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी आपले नामांतर ‘लाजरस’ असेही केले. मल्याळम भाषेत देवसहायम, ‘लाजरस’ याचा अर्थ ‘देवाची मदत लाभलेला’ असा होतो. २ डिसेंबर २०१२ रोजी देवसहायम यांना जन्मानंतर तीनशे वर्षांनी कोत्तर येथे ‘ईश्वरी आशीर्वादाने पवित्र झालेला आत्मा’ म्हणून घोषित करण्यात आले होते.