पीटीआय, नवी दिल्ली

हल्ले आणि दुय्यमतेच्या वेदनादायक इतिहासाचा बदला घेण्यासाठी भारताला केवळ सीमांवरच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या आणि हर प्रकारे मजबूत व्हावे लागेल, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी शनिवारी दिला. ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भाषणादरम्यान आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग या नेत्यांनी केलेला संघर्ष आणि त्याग याची उदाहरणे दिली.

या परिषदेला देशभरातून तीन हजार तरुण उमेदवार उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना ८१ वर्षीय डोभाल म्हणाले, “तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही स्वतंत्र भारतात जन्माला आलात. मी स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आलो. आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यासाठी ते अनेक परीक्षा आणि संकटांना सामोरे गेले.” देशाच्या विकासामध्ये नेतृत्वाची भूमिकाही अतिशय महत्त्वाची असते, हे सांगताना त्यांनी नेपोलियनचा संदर्भ दिला.

डोभाल यांनी उपस्थित तरुणांना स्वतःच्या अनुभवातून शिकण्याचा, ठामपणे निर्णय घेण्याचा आणि एकदा निर्णय घेतल्यावर त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला. स्वप्नांनी आयुष्य घडत नाही, तर ते केवळ दिशा म्हणून काम करतात, तसेच ही स्वप्ने एका दिवसात पूर्ण होणार नाहीत असा सबुरीचा सल्ला डोभाल यांनी दिला.

बदला हा चांगला शब्द नाही. पण त्यामुळे प्रचंड बळ मिळू शकते. आपल्याला आपल्या इतिहासाचा बदला घ्यावा लागेल आणि या देशाला अशा ठिकाणी न्यावे लागेल, जिथे आपण केवळ सीमा सुरक्षेच्या बाबतीतच नव्हे तर अर्थशास्त्र, सामाजिक विकास, अशा प्रत्येक बाबतीत पुन्हा महान होऊ. – अजित डोभाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार