Bihar MP speaks Marathi to Devendra Fadnavis : गेल्या काही वर्षांपासून देशात भाषिक वाद निर्माण झाला आहे. राज्यातील स्थानिक भाषा परप्रांतीयांना सक्तीची करण्यात येत असल्याने ठिकठिकाणी संघर्ष निर्माण होत आहे. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिहारचे एक खासदार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चक्क मराठीतून संवाद साधताना दिसत आहेत. तेही अत्यंत अस्खलित मराठीत हे संभाषण झालंय.

बिहारमध्ये महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्रीय जेवण

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील अनेक भाविक अडकले. या भाविकांना बिहार सरकारने भारतात आणलं. हे भाविक बिहारमध्ये उतरले होते. तिथे बिहार सरकारने त्यांच्या जेवणाचीही सोय केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील भाविकांसाठी त्यांनी महाराष्ट्रीय पद्धतीने जेवण दिलं. त्यामुळे एका महिलेने बिहारचं कौतुक केलं. ती म्हणाली, “एक नंबर महाराष्ट्रीयन जेवण. यामुळे आमचं मन आनंदी झाले. सर, भाजी तर एक नंबर आहे. जेवण अगदी प्रेमाने बनवलं गेलं आहे.” महिला कौतुक करत असताना तिच्या मागे उत्तर बिहारमधील जेडीयूचे खासदार देवेश चंद्र ठाकूर उभे होते. तेही लागलीच म्हणाले की हीच तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील या भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांना सुरक्षितपणे नागपूरला रवाना करण्याची तयारी केली आणि सितामढीचे खासदार देवेश चंद्र ठाकूर स्वतः या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होते.

यासोबतच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खासदार देवेश चंद्र ठाकूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चक्क मराठीतून संवाद साधताना दिसत आहेत. “हो साहेब! एकदम आरामशीर आहे, काही समस्या नाही. काही अडचण नाही. ते सर्व आमच्यासोबत आहेत, सुरक्षित आहेत”, असं ७३ वर्षीय खासदारांनी फडणवीस यांना फोनवर सांगितलं.

या यात्रेकरूंसाठी पाटणा-नांदेड एक्सप्रेसला एक अतिरिक्त डबा जोडण्याची व्यवस्था ते करत होते. सितामढीचे खासदार ठाकूर यांच्या या व्हिडिओंवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही जण आश्चर्यचकित झाले, तर काहींनी कौतुक करत म्हटलं की भारताला अशाच भाषिक सलोख्याची गरज आहे. दुसरीकडे, अनेकांनी यातील विरोधाभास अधोरेखित केला की, महाराष्ट्रात पूर्व भारतातील राज्यांमधून आलेल्या स्थलांतरितांना स्थानिक भाषेवरून विरोध आणि दबावाचा सामना करावा लागत असताना, बिहारचे एक राजकारणी मात्र इतकी सुंदर मराठी बोलत आहेत.

काहींनी असंही नमूद केले की ठाकूर महाराष्ट्रात राहिले असून त्यांनी तिथंच शिक्षण घेतल्यामुळे ते मराठी शिकले. आणि याच कारणामुळे सितामढीचे खासदार देवेश चंद्र ठाकूर नेपाळहून परतणाऱ्या यात्रेकरूंशी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर मराठीत संवाद साधू शकले.

२६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे भोटे कोशी-त्रिशुली नदी प्रणालीत बर्फ, खडक, चिखल आणि पाणी वाहून आले होते. काही दिवसांनंतर, महाराष्ट्रातील १०६ यात्रेकरूंचा एक गट सितामढीमार्गे बिहारमध्ये दाखल झाला, जिथे जिल्हा प्रशासनाने त्यांना पाटणामार्गे नागपूरला पाठवण्यापूर्वी अन्न, निवारा आणि वैद्यकीय मदत पुरवली. नेपाळमधील या आपत्तीमुळे बिहारमध्ये वाहणाऱ्या गंडक, बागमती, कमला बलान आणि कोसी यांसह अनेक नद्यांची पाण्याची पातळी वाढली होती. परिणामी, बिहारने असुरक्षित उत्तर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता.