लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सध्या जग गंभीर अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे. विविध पातळ्यांवरील एकाच वेळी घडणाऱ्या बदलांमुळे जागतिक आर्थिक वाढीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडे या बदलाचे नेतृत्व करण्याची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दिल्लीमध्ये सोमवारी ‘सीआयआय’च्या वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेमध्ये केलेल्या भाषणात फडणवीस यांनी भारताच्या जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. “जग सध्या एकाच वेळी अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. भू-राजकीय तणाव, तंत्रज्ञानातील वेगवान बदल, ऊर्जा संक्रमण आणि पुरवठा साखळीतील पुनर्रचना अशा अनेक घटकांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. असे असले तरी, जागतिक स्तरावर विश्वास निर्माण करणारा देश म्हणजे भारतच. हे केवळ मोठी बाजारपेठ किंवा उत्पादनक्षम तरुण लोकसंख्या या मुद्द्यांमुळे नव्हे तर, स्थैर्य, महत्त्वाकांक्षा, लवचीकता आणि अंमलबजावणीची क्षमता हे सकारात्मक मुद्देही महत्त्वाचे ठरतात,” असे मत मांडत फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

गेल्या दशकात भारताबद्दलची जागतिक धारणा मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारताकडे आता केवळ आर्थिक-व्यापारी संधी मिळवण्याचा देश म्हणून पाहिले जात नाही, तर विकासाच्या शक्यता आणि त्यासाठी गरजेची परिणामकारक अंमलबजावणी करू शकणारा देश म्हणून भारत ओळखला जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र बदलाच्या नेतृत्वासाठी सज्ज!

जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्राची तयारी सुरू आहे. त्याद्वारे महाराष्ट्र मोठ्या आर्थिक बदलांचे नेतृत्व करू शकेल. राज्याला केवळ भारताचे ‘आर्थिक इंजिन’ न ठेवता, जागतिक स्तरावर मजबूत अर्थव्यवस्था बनवण्याचे शर्थीने प्रयत्न केले जात आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सीआयआय’च्या कार्यक्रमात राज्याच्या आर्थिक विकासाची दिशा स्पष्ट केली.

राज्याला २०३०पर्यंत १ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे आणि २०४७ पर्यंत जगातील महत्त्वाच्या प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य असल्याचेही फडणवीस म्हणाले. यावर्षी दावोस येथे राज्याने सुमारे ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाचे करार केले आहेत. आजचे गुंतवणूकदार फक्त सवलती पाहत नाहीत, तर दीर्घकालीन विश्वास, जलद निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणीचीही अपेक्षा ठेवतात. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात ‘विश्वास’ हीच खरी ताकद असून, महाराष्ट्र या ‘विश्वासा’ला प्राधान्य देतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्याची आघाडी

सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे ६६० अब्ज डॉलरची असून, भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये (जीडीपी) राज्याचा वाटा सुमारे १५ टक्के आहे. तसेच, देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते. अभियांत्रिकी निर्यातीतही राज्याचा वाटा २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय, महाराष्ट्र डेटा सेंटर आणि स्टार्टअप क्षेत्रात आघाडीवर आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मुंबई जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित होईल. पुणे तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रात आघाडीवर राहील. नागपूर लॉजिस्टिक हब होईल. तर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि गडचिरोली हे नवीन औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

इतिहासात काही क्षण असे असतात, जेव्हा देश बदलामध्ये सहभागी होतात आणि काही क्षण असे असतात, जेव्हा देश बदल घडवून आणतात. मला वाटते, हा भारतासाठी बदल घडवण्याचा क्षण आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री