नवी दिल्ली : ‘मला दिल्लीत पाठवावे, असे अनेकांना वाटते. मात्र त्या सगळ्यांना मी सांगतो की, मी मुंबईतच आहे’, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रात येण्याची शक्यता पुन्हा एकदा फेटाळून लावली. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांचा नवा संघटनात्मक चमू जाहीर झाला, त्याच दिवशी फडणवीस यांचा दिल्ली दौरा झाला, शिवाय, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या दिल्लीवारीबद्दल राजकीय चर्चा रंगली होती. 

‘मी महाराष्ट्रात आहे. जनतेने आणि नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे,’ असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. ‘मी दिल्लीत असलो तरी चर्चा होते आणि मुंबईत असलो तरी चर्चा होते. अनेक रिकामटेकड्या लोकांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडते. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या,’ अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही फडणवीस यांच्या दिल्ली दौर्‍यावरून राजकीय चर्चेला सुरुवात केली होती. त्यावर फडणवीस यांनी, ज्याला जे तारे तोडायचे आहेत, जे फुगे उडवायचे आहेत, जी पतंग उडवायची आहे ती उडवू द्या,’ असे नमूद केले.

विकासकामांबाबत भेट

राज्यातील विविध विकासप्रकल्पांसाठी केंद्राची मदत मिळावी यासाठी दिल्ली दौर्‍यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, उत्तन-विरार कॉरिडॉर, नदीजोड प्रकल्प यांसह केंद्राच्या मदतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्राकडून आवश्यक ती मदत मिळवून प्रकल्पांना गती देण्याचा या भेटीमागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

उत्तन-विरारसाठी निधीचा प्रयत्न

फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या उत्तन-विरार कॉरिडॉरसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीला (जायका) प्रस्ताव दिला आहे. प्रकल्पाची आर्थिक व्याप्ती मोठी असल्याने ‘जिका’बरोबर आणखी एक-दोन बहुपक्षीय वित्तीय संस्थांना सहभागी करून घेऊन संपूर्ण निधी उभारता येईल का, याचा प्रयत्न करण्याची सूचना सीतारामन यांनी केली. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील काळात त्यावर काम करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहतींसाठी निधीची मागणी

महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतींच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीसाठी आणखी आठ हजार एकर जमीन संपादित करण्यात येत असून, त्यासाठी केंद्राने काही आर्थिक हिस्सा द्यावा, अशी मागणी केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. दिल्ली-नागपूर कॉरिडॉरवर सावनेर येथे सहा हजार एकर क्षेत्रात औद्योगिक वसाहत उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरवर ‘एमआयडीसी’ची औद्योगिक वसाहत उभारण्याबाबतची मागणीही केंद्रासमोर मांडली आहे. केंद्राच्या संबंधित योजनेत महाराष्ट्राला जास्तीत जास्त औद्योगिक पार्क मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले.

पुणे मेट्रो-३च्या उद्घाटनासाठी निमंत्रण

टाटा समूहाच्या सहकार्याने उभारलेल्या पुणे मेट्रो-३चे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या चाचण्या सुरू आहेत. नव्या धोरणांतर्गत देशातील पहिली सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मेट्रो म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर या मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

पर्यावरण मंजुर्‍यांचा पाठपुरावा

केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यातील पर्यावरण आणि वनविषयक विविध मंजुर्‍या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रलंबित आहेत. त्यांची माहिती यादव यांना देऊन पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.