राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांच्यासोबत रावसाहेब दानवे आणि विखे पाटील हे देखील होते. या बैठकीविषयी मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, बैठकीनंतर फडणवीस यांनी ही बैठक महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीविषयी असल्याचं माध्यमांना सांगितलं. मात्र, तरीदेखील भाजपाचे राज्यातील महत्त्वाचे नेते दिल्लीत अमित शाह यांना भेटल्यामुळे त्यातून राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सहकार खात्याविषयी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं. “महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्यासंदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत आमची बैठक झाली. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल, अशी बैठक आज पार पडली”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“सगळ्यांना अडचणीचा मुद्दा म्हणजे सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या आयकर विभागाच्या नोटीसा. एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे हा मुद्दा सातत्याने समोर येतो आणि सहकार कारखान्यांना त्याचा त्रास होतो. आताही अशा नोटिसा आल्या आहेत. आम्ही अमित शाह यांना विनंती केली की आपण यावर उपाय करायला हवा. त्यावर सकारात्मक भूमिका घेत येत्या काळात यासंदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सहकारी साखर कारखान्यांना यातून दिलासा मिळेल. १५-२० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर यातून तोडगा निघणार आहे”, असं फडणवीसांनी नमूद केलं.